अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :-शेवगावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा अद्याप तपास लागत नाही तोच परत शेवगाव – नेवासा रस्त्यावरील ढोरा नदी पात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मयताचे नाव जय राजेश वखरे (वय-२१) असे असून त्याच्या खिशात सापडलेल्या दोन आधार कार्डवर परभणी व बीड असे वेगवेगळे रहिवासाचे ठिकाणे आहेत.
मात्र ही हत्या की आत्महत्या याबाबत नागरीकांमध्ये चर्चा सुरु आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेवगाव – नेवासा रस्त्यावरील ढोरा नदी पुलावरुन नदी पात्रातील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही जणांना बुधवार २७ रोजी दुपारी दिसले.
याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पो. हे. काँ. मरकड, बप्पासाहेब धाकतोडे, वैजनाथ चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला. व उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.एकापाठोपाठ घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे या भागात प्रचंड खळबळ उडाली आहे.