अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काल रात्री उशिरा नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली.
या घटनेने नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. दरम्यान, ही हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी उत्तर नगर जिल्ह्यातील दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रेखा जरे या सोमवारी त्यांचे चारचाकी वाहन घेऊन पुणे येथे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या आई, मुलगा व महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला माने होत्या. पुणे येथून परत येत असताना जातेगाव घाटामध्ये यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. यानंतर त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीरतेने दखल घेतली असून या मारेकर्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांसह स्थानिक गुन्हे शाखेची सहा पथके मारेकर्यांच्या मागावर आहेत. यात पोलिसांना काही धागेदोरे मिळाले असून उत्तर नगर जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या दोघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यात धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा नंबर समोर आला आहे. ही दुचाकी (एमएच 17, 2380) श्रीरामपूर आरटीओ पासिंग आहे. याबाबत आरटीओ कार्यालयाकडून पोलिसांनी माहिती प्राप्त केली आहे.
मात्र, ही दुचाकी चोरीची आहे का? याचा पोलीस शोध घेत आहे. दुचाकी क्रमांकावरून एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रेखा जरे पाटील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या त्या पदाधिकारी होत्या. तथापि, अलिकडेच त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता. कार्यकर्त्या म्हणून त्या राष्ट्रवादीत सक्रीय होत्या. मराठा क्रांती मोर्चा आयोजनात त्यांचा मोठा सहभाग होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved