अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. सुनील पोखरणा यांचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे.
कोरोना काळात त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीत बसवलेले सी सी टी व्ही खरेदीत झालेल्या लक्षावधी रुपयाच्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी सर्वप्रथम हा घोटाळा माहितीच्या अधिकारात शोधून काढला होता.
त्यावर शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार पालक मंत्र्यांची या पत्राची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालयात या भ्रष्ट्राचाराची चर्चा मोठया प्रमाणात उघडपणे होऊ लागली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले असून जिल्हा परिषदेचे मुख्य लेख व वित्त अधिकारी आंधळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे उप अभियंता जगदीश काळे दोन अधिकाऱ्यांचे पथक या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जेव्हा नगरची जनता घरात बसून होती . नगरचे सिव्हिल हॉस्पिटल चे अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या उपचारात मग्न होते तेव्हा तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरब्बीकर व आताचे शल्य चिकित्सक डॉ . सुनील पोखरणा हे सी सी टी व्ही बसवून पैसे खाण्याचा गैरप्रकार करीत होते.आता त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचे स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.