अहमदनगर जिल्ह्यातील अलीकडील काही गुन्हेगारी घटना राज्यात चर्चेचा विषय झाल्या होत्या. आता आणखी एक मोठे वृत्त आले आहे. अहमदनगरमधील एका नगरसेवकाला खंडणी प्रकरणी अटक केली आहे. अकोले नगरपंचायतीचा भाजप नगरसेवक हितेश कुंभार असे या अटक केलेल्या आरोपी नगरसेवकाचे नाव आहे.
भिवंडी बायपास रस्त्यावरील एका बिअरबार चालकाकडून डान्सबार व सर्व्हिसबार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आठ लाख रुपये आणि त्यानंतर प्रतिमहिना 25 हजार रुपये देण्याची मागणी त्याने केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही कारवाई कारवाई शुक्रवारी पहाटे झाली आहे. याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी : मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दितील भिवंडी बायपास रस्त्यावर लैला डान्सबारमध्ये हा प्रकार घडला. संतोष भोईर आणि हरीश हेगडे हे दोघेजण हा डान्सबार चालवत आहेत. हितेश कुंभार याने या बारचालकाकडून बार निर्विघ्न सुरु ठेवण्यासाठी ऑर्केस्ट्राबारचे पाच आणि सर्व्हिसबारचे तीन असे ‘वनटाईम’ आठ लाख रुपये व दर महिन्याला 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती अशी माहिती समजली आहे.
आपण मुंबई भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असे त्याने सांगितले होते. बारचालक व्यवसायात अडचण नको म्हणून संबंधित बारचालकाने अन्य बारमालकांशी चर्चा करुन मागीतलेली रक्कम देण्यास तयारही झाला. बारचालकाला वेळ देत तो व त्याचे साथीदार निघून गेले.
शुक्रवारी पहाटे नगरसेवक हितेश कुंभार व त्याचे दोन्ही साथीदार पैशांसाठी पुन्हा ‘लैला’ बारमध्ये आले होते. हितेश कुंभार हा ‘वनटाईम’ आठ लाख रुपये देण्याची मागणी करत होता. ‘पैसे न दिल्यास तुम्ही कसा बार चालवता तेच बघतो’ अशी धमकीही त्याने यावेळी दिल्यानं घाबरलेल्या बारचालकाने त्यांना थोड्यावेळ बारमध्येच प्रतीक्षा करण्यास सांगितले.
त्यानंतर बारचालकाने थेट कोनगाव पोलीस ठाणे गाठत कोनगावचे पोलीस निरीक्षक विनोद कडलग यांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ लैला डन्सबारमध्ये सापळा लावत कारवाई केली.
यावेळी मासिक हप्ता म्हणून 27 हजार रुपयांची रक्कम स्वीकरतांना पोलिसांनी नगरसेवक हितेश रामकृष्ण कुंभार (वय 33, रा.कमानवेस, अकोले) याच्यासह त्याचे साथीदार देवेंद्र चंद्रकांत खुंटेकर (रा.शासकीय निवासस्थान, चर्चगेट) आणि राकेश सदाशिव कुंभकर्ण (रा.शुक्रवारपेठ, पुणे) याना अटक केली. तीनही आरोपींची सध्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.