Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील घोसपुरी पाणी योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. योजनेतील कामाची चौकशी सुरू असून लवकरच या योजनेचे अध्यक्ष संदेश कार्ले यांच्यावर कारवाई होणार आहे,
असा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांनी केला आहे. नगर तालुक्यातील महाआघाडीच्या तथाकथित नेतेमंडळींनी घोसपुरी पाणी योजने संदर्भात स्वतःची बाजू सावरण्यासाठी, नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी पत्रकार परिषद घेत शिवाजी कर्डिले यांच्यावर बेछूट आरोप केले.
त्यावर नगर तालुका भाजप पदाधिकारी व नेतेमंडळींनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या टीकेला रविवारी उत्तर दिले. यावेळी सभापती बोठे, सूळ, घिगे म्हणाले, ज्या योजनेचा दहा वर्षांपासून अध्यक्ष म्हणून फुशारकी मारली ती योजना १९९५ साली युती सरकारच्या काळात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मंजूर केली होती.
त्यांनी मंत्रिपद नाकारून दुष्काळी तालुक्याला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने बुऱ्हाणनगर व घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या होत्या. साकळाई उपसा सिंचन योजने संदर्भात खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे तीन महिन्यांच्या आत या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष सर्वेक्षणालाही सुरुवात झाली.
लवकरच ही योजना मार्गी लागेल; परंतु केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून २० वर्षांपूर्वी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी नगर ते मुंबई साकळाई संदर्भात पायी मोर्चा काढला.त्याच गाडे यांनी किंवा त्यांच्या तथाकथित महाआघाडीच्या नेत्यांनी स्वतःच्या पक्षाचे सरकार आल्यानंतर २०१९ नंतर साकळाई योजनेच्या मंजुरी संदर्भात साधे निवेदन किंवा पत्रही दिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.