अहमदनगर ब्रेकिंग : संगमनेर मधील दोघांना कोरोना, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले ‘हे’ आवाहन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी आणखी ०६ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चौदा झाली आहे. आज कोरोना बाधित आढळलेल्या सहा जणांमध्ये दोन परदेशी व्यक्ती असून दोन जण संगमनेर येथील तर आणखी दोन जण मूळचे कोटा (राजस्थान) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील असून सध्या नगर शहरातील मुकुंदनगर येथे राहात होते.

मुकुंदनगर येथे राहणारे हे दोघे या परदेशी व्यक्तींचे भाषांतरकार म्हणून काम करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी आता परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे, मात्र, नागरिकांनी आता नियमांचे पालन करावे आणि घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे बुधवारी सकाळपर्यंत ११२ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ५१ स्त्राव चाचणी अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. त्यात सहाजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील दोन परदेशी व्यक्तीपैकी एक इंडोनेशिया येथील तर दुसरा जिबुटी येथील आहे. या व्यक्तींनी नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

त्यानंतर ते संगमनेर आणि मुकुंदनगर येथील व्यक्तींच्या संपर्कात आले होते. त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरील सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या असून संगमनेर आणि मुकुंदनगर परिसरात प्रतिबंधात्मक आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत हे नागरिक राहात असलेला परिसरातील नागरिकांची बाहेर अनावश्यक ये-जा प्रतिबंधित करण्यात यावी. या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन यावे, असे निर्देश त्यांनी पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला दिले.

सध्या जे परदेशी नागरिक निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यापैकी आतापर्यंत ४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या ४६ जणांना शोधण्यात जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने तत्परता दाखवली असून ४६ पैकी ३५ नागरिकांना यापूर्वीच जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उर्वरित ११ जणांनाही काल रात्री आणि आज सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जीवनावश्यक वस्तू, सेवा आणि पुरवठा नियमितपणे होत आहे. तरीही, अनावश्यकपणे नागरिक घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा. स्वताच्या आणि कुटुंबियांच्या चांगल्या आरोग्यासाठी घरातच राहा. सुरक्षित राहा, असे आवाहन जिल्हावासियांना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे.

आतापर्यंत आरोग्य यंत्रणेने ४३७ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील ३५६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले आहेत. आतापर्यंत १४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल १४ दिवसानंतर निगेटीव आल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते. उर्वरित रुग्णांना आता बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आता बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे, त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवणे याला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ४९० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सध्या अजून ६१ जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.

सध्या आढळलेल्या बाधित रुग्णांची तब्बेत स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताहून जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची तपासणी करुन घ्यावी, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे. स्वताच्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24