अहमदनगर ब्रेकिंग : अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची गोदावरीत आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शेवगाव येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. हंसराज हरिभाऊ बोडखे (४०) यांनी आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह कायगाव टोका (ता. नेवासे) येथील घटेश्वर मंदिराजवळ गोदावरी पात्रात सापडला.

त्यांच्यामागे आई, वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. बोडखे हे रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चारचाकी वाहन घेऊन बाहेर गेले होते. त्याच दिवशी रात्री १० वाजून २६ मिनिटांनी त्यांनी वडिलांना फोन करून अर्ध्या तासात घरी येतो, असे सांगितले. मात्र, ते घरी परतले नाहीत.

दुसऱ्या दिवशी त्यांची गाडी कायगाव टोका येथील पुलावर बेवारस उभी असल्याची माहिती मिळाल्यावर कुटुंबीय व मित्रांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता १० वाजून २७ मिनिटांनी म्हणजे वडिलांना फोन केल्यानंतर लगेच त्यांनी मोबाइल बंद करून ठेवल्याचे निदर्शनास आले.

कायगाव टोका येथील जुन्या पुलावर त्यांनी गाडी उभी केली होती. तेथे जायकवाडी धरणाच्या पाण्याचा फुगवटा आहे. नातेवाईकानी त्या परिसरातील माहीतगार व पोहणाऱ्या व्यक्तींना बोलावून घेत शोध घेतला.

मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत शोध लागला नाही. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. डॉ. बोडखे यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळावी स्वभाव असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.

अहमदनगर लाईव्ह 24