ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘त्या’ चार बेपत्ता मुलींचा लागला शोध

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या चार अल्पवयीन मुलींना शोधण्यास नगरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील (ए.एच.टी.यु.) पथकाला अखेर यश आले आहे.

यातील दोन मुली संगमनेर तर दोन नेवासा तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे स्थानिक पोलिस ठाण्यातून ए.एच.टी. यु. कक्षाकडे तपास वर्ग झाल्यावर अवघ्या महिना भरात सदर चारही गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

नेवासा तालुक्यातील जळके येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी फुस लावुन पळवुन नेले होते. सदर बाबत नेवासा पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास न लागल्याने तो २ ऑगस्ट २०२३ रोजी ए. एच.टी.यू. कक्षाकडे तपासकामी वर्ग करण्यात आला होता.

सदर अपहरीत मुलगी ही जळके गावातून ताब्यात घेतली. पुढील कार्यवाहीसाठी नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरी एक अल्पवयीन मुलगी भेंडा येथून १४ एप्रिल २०२१ रोजी बेपत्ता झाली होती. त्याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील अपहृत मुलीची विविध मार्गांनी माहिती घेत असताना सदर मुलीला उत्तरप्रदेशातील एका इसमाने पळवून नेले होते. ती मुलगी आपल्या एक वर्षाच्या मुलासह भेंडा परिसरात आली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तेथे जावून त्या मुलीला तिच्या मुलासह ताब्यात घेवून नेवासा पोलिसांकडे सुपूर्द केले.

आरोपी मात्र तेथे आढळून आला नाही. संगमनेर तालुक्यातील निमज येथील अल्पवयीन मुलीला १२ डिसेंबर २०२१ रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. या पथकाला सदर मुलगी शिर्डी येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने तेथे जावून दोघांना ताब्यात घेत संगमनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

संगमनेर तालुक्यातील आणखी एका मुलीला निमगाव पागा येथून पळवून नेले होते. या पथकाने आरोपीला व त्या मुलीला खेडले परमानंद (ता. राहुरी) येथे पकडले.

Ahmednagarlive24 Office