अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील पाडळीआळे शिवारात २४ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला असून बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तरूणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहीती हाती आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि निघोज येथील मंथन हॉटेलमध्ये हा तरूण वेटर म्हणून काम करीत होता. दोन दिवसांपासून तो कामावर नव्हता.
मन्सूर अन्सारी (वय २४ रा. बिहार) असे त्याचे नाव असल्याचीही माहीती हाती आली आहे. निघोज येथील मंंथन हॉटेलमधील वेटर मन्सूर अन्सारी हा मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हॉटेलबाहेर पडला.
मद्यप्राशन करून तो गावामध्ये फीरलाही. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याने हॉटेलचे मालक राहूल लाळगे यांना फोन करून मी शुगर फॅक्टरीजवळ आहे, मला हॉटेलला यायचे आहे असे सांगितले.
मात्र त्यास निश्चित पत्ता सांगता येत नव्हता. दोन तिन वेळा अर्धवट माहीती देऊन तो फोन कट करीत होता. मला काही लोकांनी इकडे फसवून आणले आहे, असेही तो सांगत होता. त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता.
तो एका हिंदी भाषिक व्यक्तीसोबत मंगळवारी दुचाकीवरून प्रवास करीत होता. खोटी माहिती सांगू नकोस असेही ती व्यक्ती मन्सूर यास सांगत होता.
बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांना पाडळीआळे परीसरातून एका तरूणाचा खुन झाल्यासंदर्भात फोन आला.
बळप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही धागेदोरे हाती लागतात काय याची चाचपणी केली. मृतदेह ताब्यात घेण्यात येउन तो पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
दरम्यानच्या काळात पोलिसांनी मृतदेहाची छायाचित्रे सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरीकांपर्यंत पोहचविल्यांनतर मंथनचे मालक राहुल लाळगे यांनी त्यास ओळखले.
पारनेर येथे राहुल यांनी मन्सूरची ओळख पटविल्यानंतर लाळगे यांनीच त्याच्या खुनाची फिर्याद दाखल केली. दरम्यान, सहाय्यक पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षकांनी बुधवारी रात्रीच पारनेरला भेट देऊन गुन्ह्याच्या तपासासंदर्भात सूचना दिल्या.