अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसाचा नरबळी, पत्नीचा संशय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर शहरातील एका मठात राज्य राखीव पोलिस दलातील प्रमोद बबन राऊत (वय ३१, रा. शिवनगर, पाईपलाईन रोड, नगर) यांचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. परंतु राऊत यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा घातपात झाला आहे. तसेच हा प्रकार नरबळी असल्याचा संशयही व्यक्त करत मठातील भोंदूबाबांसह सेवेकऱ्­यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राऊत यांच्या पत्नी प्रिया राऊत यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात प्रिया राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे पती प्रमोद बबन राऊत हे ७ फेब्रुवारी रोजी शहरातील एका मठात मयत झाले असून त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही. त्यांचा मृत्यू घातपात होऊन झाला आहे. याबाबत मी व माझ्या सर्व नातेवाईकांनी निर्माण झालेल्या संशयावरून संबंधित पोलिस स्टेशनला तात्काळ संपर्क साधून फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता सदर फिर्याद घेण्यात आलेली नाही.

माझे पती पोलीस खात्यात सेवेत होते. ते नागपूर येथे असताना त्यांना केडगाव येथील एका व्यक्तीने त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावरून फोन करून नगर येथील कल्याण रोडवरील मठात ताबडतोब बोलून घेतले. यावेळी माझे पती कोणालाही न सांगता तातडीने त्यांना भेटायला मठात गेले असता तेथे त्यांचे व माझे पती दरम्यान वाद निर्माण झाला.

सदर वादासंदर्भात माहिती माझे पतीने मला फोन करून दिली. तसेच त्यांना त्या मठातून बाहेर पडू दिले जात नाही, अशी तक्रारही केली होती. परंतु नंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास माझ्या पतीचा मृत्यू झाल्याबाबत मला माहिती देण्यात आली. त्यावेळी मला घेण्यासाठी त्यांच्या मठातील काही सेवेकरी आले होते. ते मला दौंडवरून नगर येथे घेऊन आले. माझे पतीचे आकस्मित निधन झाले समजल्यानंतर मी व माझ्या संपूर्ण परिवार याबाबत विचारणा करू लागले.

त्यावेळी आम्हाला सेवेकऱ्­यांनी सांगितले की, तुमचे पती ज्या कारणामुळे मयत झाले आहेत ते कारण न टाकता तुम्हाला मृत्यूपश्चात चांगली रक्कम मिळावी, यासाठी त्यांचा मृत्यू साप चावून झाला आहे, अशी कागदपत्रे आम्ही तयार केली आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे आमचा संशय बळावल्याने आम्ही याबाबत अधिक चौकशी सुरू केली असता असे निदर्शनास आले आहे की माझे पतीला मारहाण झाली होती व तशी छायाचित्रे देखील उपलब्ध आहेत.

परंतु त्यांच्या पोस्टमार्टममध्ये त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा दाखविण्यात आलेल्या नाहीत. तसेच त्यांचा मृत्यू ज्या कारणामुळे झाला त्याबाबत प्रश्न उपस्थित केलेला आहे. मठातील महाराजांकडे चौकशी करायला गेलो असता ते आमच्यावर धावून आले तसेच त्यांनी सोबत भला मोठा जमाव आणून माझ्या राहत्या घरी येऊन या प्रकरणाची जास्त चौकशी न करण्याची व शांत राहण्याची धमकी दिली आहे.

माझे पतीचा ज्या दिवशी सदर ठिकाणी खून झाला, त्यावेळी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता. त्यामुळेच या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात माझ्या पतीचा नरबळी दिल्याचा दाट संशय निर्माण होत असून तेथे उपस्थित सेवेकऱ्यांनी व माझे पतीने कार्यक्रमाचे मोबाईलवर काढलेले फोटो, व्हिडिओ डिलीट करण्यात आलेले आहे. तरीही त्यातील एक फोटो उपलब्ध झाला असून त्यावरून सदर घटना नरबळी असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24