अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील शेवगाव आगारातून बस सेवा सुरू झाली होती. मात्र मागील दोन दिवसात तीन बसवर दगडफेक झाल्याने कर्मचारी धस्तावले आहे.
त्यामुळे रविवारी पोलीस बंदोबस्तात बस मार्गस्थ झाल्या. मात्र दुपारी पुन्हा नेावाशाकडे जाणार्या एका बसवर दगडफेक झाल्याने कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यातील केवळ शेवगाव आगारातून बस सोडण्यात येत आहेत. शुक्रवारी सुरू झाल्या होत्या. मात्र शुक्रवारी व शनिवारी दोन्ही दिवशी बसवर दगडफेक झाली.
यामुळे बस वाहतुक ठप्प झाली होती. काल आगारातून अधिकच्या पोलीस बंदोबस्तात अंशतः प्रवाशी वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली. येथील आगारातून दुपारपर्यंत ११ बस विविध ठिकाणी सोडण्यात आल्या.
यात पैठण ,पुणे, नगर, गेवराई व नेवासा यांचा समावेश आहे. मात्र दुपारी पुन्हा शेवगाव येथुन नेवाशाकडे निघालेल्या एसटी बसवर अज्ञात इसमाने दगडफेक केल्याची घटना नेवासा फाटा परिसरात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
या घटनेत बसच्या पुढील बाजूची काच फुटली असून चालक दत्तात्रय नारायण काकडे यांच्या छातीला मार लागला असून या अवस्थेतही त्यांनी आपली बस पुन्हा शेवगाव आगारात आणून आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्याना घटनेची माहिती दिली.