अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातून सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरुन धावणार्या कारचा पुढील बाजूचा टायर फुटल्याने कारने थेट तीन पलट्या खाल्ल्या.कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
यामध्ये केवळ दैव बलवत्तर असल्याने पती, पत्नी व तीन वर्षांचा चिमुरडा बालंबाल बचावले आहेत. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राहुल दौलतराव बडवर हे पत्नी प्रियंका व मुलगा अन्वेश मोशी (जि.पुणे) येथून कारमधून (क्रमांक एमएच.१४जेए.२९२६ मूळगावी वाकद (ता.निफाड, जि.नाशिक) येथे गेले होते.
परत ते वाकद येथून संगमनेर मार्गे सोमवारी पुणे येथे जात होते सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरुन जाताना घारगाव शिवारात आले असता अचानक कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने कारने थेट तीन पलट्या खाल्ल्या. त्यानंतर महामार्गाच्या कडेला कार चारीही चाके वर झालेल्या अवस्थेत स्थिरावली.
या अपघातात चालक राहुल बडवर यांच्या हाताला जखम झाली असून पत्नी व तीन वर्षांचा मुलगा यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. सुदैवाने कोणतीही जीवितनाही झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.
कार ज्याठिकाणी पलटी झाली तेथून काही अंतरावरच खोल दरी होती. जर त्या दरीत कार गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता.केवळ दैव बलवत्तर असल्याने बडवर कुटुंब हे अपघातातून बालंबाल बचावले आहेत. टायर फुटल्याने चालक बडवर यांचा कारवरील ताबा सुटल्याने कारने तीन पलट्या घेतल्या.
कारची चारही चाके वर झाली. या अपघातात हे कुटुंब बचावले असून बडवर यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. यात कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.