अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :राहुरी वनविभागाच्या साठवण बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या सख्ख्या शाळकरी भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आली.
साक्षी शंकर गागरे (वय ८) व सार्थक शंकर गागरे (वय १०, गाडकवाडी, ता, राहुरी) अशी त्यांची नावे आहेत. आई व वडील रोजंदारीच्या कामासाठी शेतावर गेले असताना साक्षी व सार्थक वरशिंदे शिवारातील साठवण बंधाऱ्यात पोहायला गेले होते.
गेल्या चार दिवसांपासून परिसरात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यात पाणी वाढले आहे. त्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. सायंकाळी आई-वडील कामावरून घरी आले.
आपल्या लाडक्या लेकरांना त्यांनी हाक मारली, पण आवाज आला नाही. मुलांचा शोध घेण्यास त्यांनी सुरूवात केली. बंधाऱ्याच्या बाहेर दोघांचे कपडे काढून ठेवलेले दिसले. त्यावरून ते पाण्यात उतरले हे उघडकीस आले.
पाण्यात शोध घेतला असता दोघांचे मृतदेह सापडले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी सकाळी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews