नगर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने नगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
राष्ट्रवादीकडून नगरचे आमदार संग्राम जगताप यांना नक्कीच मंत्रिपद मिळेल, असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केला.
जगताप यांच्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जिल्ह्याचे मंत्रिपद निश्चित आहे. मात्र, ते कोणाला मिळणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. कर्जत-जामखेडचे आमदार तथा शरद पवारांचे नातू रोहित पवार हेही मंत्रिपदाचे दावेदार ठरू शकतात.
मात्र, पहिल्यांदाच आमदार झालेल्या पवार यांना मंत्रिपद दिले जाईल का? याबाबत शंका आहे. राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी पाचजण प्रथमच आमदार झाले आहेत. त्यामुळे अनुभवी म्हणून जगताप यांनाच जिल्ह्यातून मंत्रिपद मिळेल, अशा चर्चा सुरू आहेत.