नगर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे जाणार की, पुन्हा विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे अध्यक्षपद आपल्याकडेच राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. महिन्याभरात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सध्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे आहेत. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे आहे.
शालिनी विखे यांनी अद्याप काँग्रेस सोडलेली नाही. त्यामुळे या पदावर त्या पुन्हा दावा करण्याची शक्यता आहे. मात्र, आता महाराष्ट्रात महाविकास सत्तेवर येणार आहे. काँग्रेसच्या एकूण २३ पैकी १३ सदस्य हे विखे गटाचे, तर दहा थोरात गटाचे आहेत.
दोन्ही गटांची सदस्य संख्या लक्षात घेता विखे पुन्हा अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करण्याची शक्यता आहे. त्यात थोरात गटाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
थोरात गटाकडून या पदासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नावही पुढे येण्याची शक्यता आहे. राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता या पदासाठी राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष असलेल्या राजश्री घुले याही प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
Latest News Updates