ब्रेकिंग

अहमदनगर : ग्रामपंचायतीचा शिपाई झाला सरपंच, दोन पिढ्या गावाला पाणी घातलं आता गावाने सरपंच पदावर बसवलं

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राजकारणात काय होईल हे सांगता येणे मुश्किल आहे. परंतु बऱ्याचदा जनता जनार्दन असा काही चमत्कार करवते की अगदी होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते होऊन जाते. परंतु हा नियम काही खासदारकी,आमदारकी सारख्याच मोठ्या निवडणुकांना लागू आहे असे नव्हे.

कारण याचा प्रयत्य आता ग्रामपंचायतच्या निवडणुकांत देखील आला आहे. अहमदनगर मधील असं एक गाव आहे जेथे एका ग्रामपंचायत शिपायाने थेट सरपंच पदाची खुर्ची पटकावली आहे. विशेष म्हणजे या शिपायाच्या वडिलांपासून गावाला पाणी घालण्याचे काम केलं जात होते.

नामदेव किसन शिंदे असे या ग्रामपंचायत कर्मचारी तथा आताचे सरपंच यांचे नाव आहे. व ते गाव आहे संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बुद्रुक.

आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंचपद अनुसूचित जमातीतील व्यक्तीसाठी राखीव होते. या निवडणुकीसाठी आमदार बाळासाहेब थोरात, प्रणित आमरेश्वर ग्रामविकास मंडळाकडून नामदेव किसन शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली. त्यानंतर त्यांनी आपल्या शिपाईपदाचा राजीनामा दिला होता.

दोन पिढ्या गावाला पाणी पुरविण्याची सेवा

नामदेव शिंदे तब्बल चाळीस वर्षांपासून आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये पाणी सोडण्याचे काम करत आहेत तर विशेष म्हणजे त्यांचे वडील किसन शिंदे सायकलवर गावाला पाणी पुरविण्याचे काम करत होते.

म्हणजेच शिंदे कुटुंबीयांच्या दोन पिढ्या गावाला पाणी पुरविण्याची सेवा करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गावाने देखील त्यांच्या या सेवेची दखल घेतली असच म्हणावं लागेल. नागरिकांनी त्यांना ग्रामपंचायतीत विजयी करून थेट सरपंच पदी बसवत कामाची बक्षिसी दिली.

काय म्हणतात सरपंच नामदेव शिंदे

निवनियुक्त सरपंच नामदेव शिंदे यांनी अगदी नम्रभाषेत प्रतिक्रया दिली. ते म्हणाले, ग्रामस्थांनी आग्रह केला म्हणून मी निवडणूक लढलो. त्यात मतदारांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला.

आता मी चांगले काम करील.आमचे मार्गदर्शक विजय हिंगे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने आता गावाचा विकास करणार आहे असे शिंदे म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24