दुचाकी-ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील प्रगतशील शेतकरी, संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब सीताराम कांबळे (वय ६२) यांचा काल सायंकाळी रेल्वे ओव्हरब्रीजजवळ झालेल्या दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत मृत्यू झाला. 

याबाबत माहिती अशी की, कांबळे हे नेहमीप्रमाणे श्रीरामपूर येथून काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भोकरकडे चालले होते. श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावरील रेल्वे ओव्हरब्रीज ओलांडून एफसीआय गोडाऊनजवळ त्यांची दुचाकी (क्र. एमएच १७ सीए ६९६०) आली असता समोर चाललेल्या अज्ञात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्यांची जोराची धडक बसली.

 या अपघातात कांबळे हे डांबरी रोडवर जोराने आदळले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातानंतर त्यांना साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अपघाताचे वृत्त भोकरसह पंचक्रोशीत समजताच अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्यांच्यावर आज बुधवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता भोकर शिवारातील हनुमानवाडी कांबळे वस्ती येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 

त्यांच्या पश्चात पत्नी मंगलाताई, मुलगा अभिजित व तीन विवाहित मुली, तीन भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. एसटी महामंडळातील सेवानिवृत्त वाहक म्हणून सेवा केलेले रावसाहेब, शेतकरी असलेले विलास, प्रभात डेअरीचे दूध संकलन केंद्राचे संचालक व संजीवनी पतसंस्थेचे संचालक गणेश सीताराम कांबळे यांचे ते थोरले बंधू होत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

 

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24