नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर: महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर पंपिंग स्टेशन येथील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर, तसेच विळद पंपिंग स्टेशन येथे बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.
त्यामुळे पंपिंग स्टेशनहून होणारा पाणीपुरवठा बंद झाला. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा पाणीउपसा करण्यास सुरुवात झाली आहे.
परंतु पूर्ण दाबाने पाणी येण्यासाठी किमान चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे शुक्रवारी पाणी वाटप सुरू असलेल्या भागांतर्गत बोल्हेगाव, नागापूर, पाइपलाइन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, तसेच स्टेशन रस्ता, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, बालिकाश्रम रस्ता या भागास पाणीपुरवठा करण्यात आला नाही. या भागाला शनिवारी (२३ नोव्हेंबर) पाणीपुरवठा होणार आहे.
शनिवारी रोटेशननुसार मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी आदी भागात उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती मनपाने दिली.
शहराला पाणी पुरवणारे २६ टीएमसी क्षमतेचे मुळा धरण सध्या पूर्ण भरले आहे. तथापि, महापालिका व महावितरणच्या गलथान कारभारामुळे नगरकरांना व्यवस्थित पाणी मिळत नाही.
अहमदनगर लाईव्ह 24