अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळण्यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराला कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे.
यासंबंधी त्यांनी राज्य सरकारला कळविले असून भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा एक व्हिडिओही जारी केला आहे. केंद्रिय कृषीमंत्र्यांचे पत्र घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ शेतक-यांच्या प्रश्नी चर्चा झाली.
परंतु, मी माझ्या ३० जानेवारीच्या उपोषणावर ठाम आहे. त्यात काही बदल नाही, असे सांगत अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्धार कायम असल्याचे जाहीर केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी येतील,
ते सकाळी पुण्याहून निघतील असे जिल्हा महसूल व पोलिस प्रशासनाला कळवण्यात आले होते.मात्र हजारे फडणवीस यांना भेटण्यास उत्सूक नसल्याने फडणवीस सकाळी पुण्यातून निघाले नाहीत.सकाळची भेट रद्द करण्यात आली. सन २०१८ मध्ये दिल्लीत व २०१९ मध्ये राळेगणसिद्धीत झालेल्या आंदोलनाच्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत हजारे यांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते.
सन २०१९ मध्ये राळेगणसिद्धीत झालेल्या उपोषणाच्यावेळी फडणवीस यांनी तब्बल सहा तास हजारे यांची मनधरणी केली होती. फडणवीस यांच्या शब्दाखातर हजारे यांनी दोनदा उपोषण मागे घेतले.मात्र दोनही वेळेस दिलेल्या लेखी आश्वासनांचे पालन भाजपप्रणित केंद्र सरकारने केले नाही.
त्यासंदर्भात हजारे यांनी पाठविलेल्या पत्रांना पंतप्रधान कार्यालयाने उत्तरे दिली नाहीत.त्यामुळे फडणवीस यांना भेटण्याची, चर्चा करण्याची हजारे यांची इच्छा नव्हती. हजारे भेट देण्याचे टाळत असल्याने सकाळी साडेनऊची भेट रद्द करण्यात आली व दुपारी साडेबाराची वेळ फडणवीसांकडून प्रशासनाला देण्यात आली.
त्यावेळीही हजारे यांनी आता चर्चा, आश्वासने पुरे झाली आता शेतकरी हिताच्या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घ्या असे सांगत भेट नाकारली. त्यानंतर माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वारंवार हजारे यांच्याशी संपर्क साधत फडणविसांना भेट देण्याची गळ घातली.त्यानंतर दुपारी साडेचार वाजता फडणवीस राळेगणसिद्धीत येतील असे सांगण्यात आले.
मात्र तरीही हजारे भेटण्यास फारसे उत्सूक नव्हते.अखेर वारंवार विचारणा करण्यात आल्यानंतर हजारे फडणविसांना भेट देण्यास तयार झाले व संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राळेगणसिद्धीत पोहोचले.राळेगणसिध्दीत आल्यापासून आणि बैठकीच्या वेळीही फडणवीसांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री राधाकृष्ण विखे,शिरुरचे माजी आमदार बाबूराव पाचार्णे त्यांच्या समवेत होते. तासभर चाललेल्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे काहीच झाले नाही व फडणवीस यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले ! दरम्यान केंद्र सरकारने दिल्लीत अजून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिलेली नाही.
दोन वर्षांपूर्वी अण्णांनी दिल्ली व राळेगणसिद्धी येथे उपोषण केले होते. त्यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असणारा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या, असे सांगितले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकऱ्यांना अजूनही पिकांना हमीभाव दिला जात नाही.
उलट शेतकऱ्यांच्या पिकांच्या हमीभावातच केंद्र सरकारने रक्कम कमी केल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. केंद्रीय कृषिमूल्य आयोग सध्या कृषिमंत्री यांच्या अखत्यारीत असून, त्या आयोगाला स्वायत्तता द्यावी, अशी मागणी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.