श्रीरामपूर : पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या प्रारंभीच इतिवृत्तात सूचक, अनुमोदक लिहिण्यावरून वाद उफाळून येताच नगरसेविकांना भारती कांबळे यांनी तत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला असता नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचा पारा चांगला चढला. त्यांनी तुम्ही तत्त्वाच्या गोष्टी करता, तर मग माझे घर कधी सोडता ते सांगा.
घरातूनच स्वच्छतेची सुरवात करा, असे सुनावताच, कांबळे यांनी तुमच्या बहिणीच्या खात्यात वेळच्या वेळी भाड्याचे पैसे जमा होतात, असे स्पष्टीकरण जोडले. या वादात उपस्थित नगरसेवकांनी मध्यस्थी करत सर्वसाधारण सभेत वैयक्तिक विषयांऐवजी अजेंड्यावरील विषय घेण्याचे सुचविले.
नगराध्यक्षा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी बी. सी. गावित, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह दोघे वगळता सर्वच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
इतिवृत्तातील सूचक, अनुमोदकांवरूनच वादाची ठिणगी पडली. कांबळे-आदिक यांच्यात घर खाली करण्यावरून चांगलात वाद झाला. आदिक यांनी कांबळे यांना सुनावताना घरात घुसून बसले, तुमचा घरावर कब्जा करायचा विचार आहे, विना करार तुम्हाला घर देवून चूक केली का अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू ठेवत, तुम्ही नात्याची किंमत काय ठेवली, स्वत:चा राग, द्वेष काढण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवायला तुम्हीच माझ्याकडे आला होता.
उपनगराध्यक्ष ससाणे यांनी वैयक्तिक विषय याठिकाणी काढू नये. त्या (कांबळे) माझ्या आत्या आहेत, असे म्हणताच आदिक यांनी विना करार तुमचे घर त्यांना द्या, असे सुचविले. या वादात नगरसेवक अंजुम शेख, श्यामलिंग शिंदे, राजेश अलघ, मुजफ्फर शेख, श्रीनिवास बिहाणी यांनी मध्यस्थी केली.
पालिकेची इमारत १९६४ सालची आहे. कर्मचाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था अपुरी पडते. विभागनिहाय बैठक व्यवस्था करावी लागेल, अशी भूमिका मुख्याधिकारी गावित यांनी मांडली.
त्यावर अलघ यांनी अकौंटच्या व्यक्तीला आरोग्याला, तर अभियंत्याला आस्थापनेला टाकू नका. ज्याला त्या विभागाची जाण आहे, त्याला त्याठिकाणी बसविल्यास प्रशासकीय कामे सुरळीत होतील, अशी सूचना मांडली.