अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: जिल्ह्यातील कोपर्डी, लोणी मावळा येथील निर्भयांनवर झालेल्या अत्याचार प्रकरणी लवकर सुनावणी होऊन लवकर निकाल लागला पाहिजे यासाठी आपण राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्र लिहिले असल्याचे अण्णा हजारे यांनी लिखित संदेश दिला.
महिलांच्या सुरक्षेसाठी व दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशी, यासह महिलांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या मौन आंदोलनात चौथ्या दिवशी समर्थ शैक्षणिक संकुल, म्हसणे फाटा, वाशीम, मालेगाव येथील विद्यार्थ्यानी आंदोलन केले.
महिलांच्या सुरक्षेसाठी देशभरात हेल्पलाईन सुरू करावी, महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकर सुनावणी होऊन दोषींना शिक्षा द्यावी यासह काही प्रश्नांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून राळेगणसिद्धीत मौन आंदोलन सुरू केले आहे.
सोमवारी सकाळी पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील समर्थ शैक्षणिक सकुलचे प्रमुख कैलास गाडीलकर, शिल्पा गाडीलकर यांच्यासह समर्थच्या मुलींनी राळेगणसिद्धीत फेरी काढली. संत यादवबाबा मंदिरात अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झाले.
यावेळी शिल्पा गाडीलकर, प्राचार्या अरुणा भांबरे, श्रुती अंबाडे, सुजाता कोरडे, विद्यार्थ्यांनी श्रुतिका करजुले, मोहिनी रासकर, पायल पवार, समृद्धी जासूद, सुप्रिया येणारे, निशा भुजबळ, अर्पिता भालेकर यांनी महिलांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. यासह वाशीम, मालेगाव येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.