अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव, पिकांसाठी नांगरणीसह अधिक ५० टक्के उत्पादन खर्च द्यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान अण्णाचे हे कोठे करण्यात येणार आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही आहे. अण्णांनी काही दिवसांपूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता.
यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी राळेगणमध्ये येत अण्णांची भेट घेतली होती व अंदोलन करू नये यासाठी अण्णांची मनधरणी केली होती. मात्र मागण्या मान्य न झाल्याने अण्णांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.
केंद्र सरकारने दिल्लीत अजून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिलेली नाही. दोन वर्षांपूर्वी अण्णांनी दिल्ली व राळेगणसिद्धी येथे उपोषण केले होते.
त्यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असणारा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या, असे सांगितले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकऱ्यांना अजूनही पिकांना हमीभाव दिला जात नाही.
उलट शेतकऱ्यांच्या पिकांच्या हमीभावातच केंद्र सरकारने रक्कम कमी केल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. केंद्रीय कृषिमूल्य आयोग सध्या कृषिमंत्री यांच्या अखत्यारीत असून, त्या आयोगाला स्वायत्तता द्यावी, अशी मागणी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.