Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यामधील गुन्हेगारी घटना सातत्याने उच्चांक करताना दिसतायेत. वकील दांपत्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता नगरमधून आणखी एका वकिलावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जुन्या न्यायालयाच्या आवारातच सदर वकिलावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला. वकिलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
काल (दि.8 मे) बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. अॅड. अशोक कोल्हे, असे हल्ला झालेल्या वकिलाचे नाव आहे. हल्ल्यात जखमी वकिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यामध्ये आले आहे.
हल्ल्यामागील कारण समजू शकलेले नाही. हल्लेखोर अनिल गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
अधिक माहिती अशी : अॅड. कोल्हे जुन्या न्यायालयाच्या आवारात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोर त्यांचा पक्षकारच असल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात कोल्हे यांच्या गालावर वार करण्यात आले असून, गालाला खोलवर जखम झालेली आहे.
दरम्यान, कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. कोतवाली पोलिसांचे पथक कोल्हे यांचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते.
परंतु, गालाला जखम असल्याने त्यांना बोलता येत नव्हते. त्यामुळे जबाब नोंदविणे शक्य झाले नाही. त्यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यावेळी वकिलांनी रुग्णालयात धाव घेत कोल्हे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
जानेवारीमध्ये झाला होता वकील दांपत्याचा खून
जानेवारी महिन्यामध्ये राहुरी तालुक्यातील उंबरे येथे वकील पती पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. आधी अपहरण करून नंतर त्यांचा खून करण्यात आला होता.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात वकील संघटना आक्रमक झाल्या होत्या. अद्याप या घटनेचा तपास लागतो न लागतो तोच अहमदनगर शहरात पुन्हा एकदा वकिलावर हल्ला करण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.