अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईनगरीच्या अर्थकारणाची वर्षभराच्या कालावधीत वजाबाकी झाली आहे. परिणामी येथील व्यावसायिकांसह सर्वचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी १७ मार्च रोजी कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद झाले.
तेव्हापासून आतापर्यंत, वर्षभरानंतरही तीच परीस्थीती आजही असल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दि. १७ मार्च २०२० ते १७ मार्च २०२१ हा संपुर्ण एक वर्षाचा कालावधी अतिशय खडतर व आर्थिक संकटात गेला. वर्षभराच्या कालखंडानंतर आजही हीच परीस्थिती कायम असल्याने सर्वांना भविष्यात काय होईल, याबाबत धाक निर्माण झाला आहे.
शिर्डीत फाईव्हस्टारपासुन तर अगदी घरगुती पद्धतीची सुमारे साडेसातशे हॉटेल, लॉजिंग आहेत. या शिवाय हार-प्रसार दुकान, खासगी ट्रॅव्हल्स, प्रवाशी वाहतुक करणारी हजारो वाहने, रिक्षा यासह अनेक छोटे-मोठे व्यवसाय, उदयोग-धंदे आहेत. अगोदरच मंदीच्या लाटेने येथील व्यावसायिक कर्जबाजारी होते.
त्यात गेल्या वर्षी कोरोना महमारीचे संकट आले. देशात कोरोनाची लाट आल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. मंदिरे, धार्मिक स्थळे बंद झाली. गेल्या १७ मार्च रोजी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. आठ महिन्याच्या कालावधीनंतर थेट १६ नोव्हेंबर रोजी दिवाळी- पाडव्याच्या दिवसापासुन मंदिर पुर्ववत खुले झाले.
तेथुन पुन्हा सर्व व्यावसायिकांना आशेचा किरण मिळाला. मंदिर प्रशासनाने शासनाच्या आदेशानुसार दर्शनाच्या संख्येत टप्याटप्याने वाढ केली. सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक दर्शन घेऊन लागले. कोरोनाबाधितांची संख्या नोव्हेंबरपासुन कमी झाल्याने पुन्हा सर्व व्यवहार पुर्ववत रुळावर येऊ लागले.
आर्थिक चक्र पुन्हा गतीमान होत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने काळजीत भर पडली. त्यात विदर्भातील काही जिल्हे लॉकडाऊन झाले. अनेक जिल्ह्यात निर्बंध घालण्यात आले, तसेच आता ३१ मार्चपर्यंत आणखी नियम कडक करण्यात आले आहेत.
कोरोनाची दुसरी संभाव्य लाट असल्याने विशेष दक्षता घेतली जात आहे. कडक उन्हाळा, मंदिर पशासनाने दर्शन पास वितरणात केलेला वेळ बदल, यामुळे शिर्डीतील गर्दी ओसरली आहे. पुन्हा गजबजु लागलेली साईनगरी भाविकांविना आता सुनीसूनी वाटु लागली आहे.