लखनऊ :- अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार तेथे कायापालट करण्याची योजना आखत आहे. येथे आगामी काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बस टर्मिनल आणि विमानतळ उभारले जाईल. सोबत रिसॉर्ट आणि पंचतारांकित हॉटेल्सही असतील. शरयू नदीत क्रूझ सेवा देण्याची योजनाही यात आहे. अयोध्या मंडळाचे माहिती उपसंचालक मुरलीधरसिंह यांनी ही माहिती दिली. सर्वात आधी अयोध्या तीर्थक्षेत्र विकास परिषद स्थापन केली जाणार आहे. या सर्व योजनांची अंमलबजावणी होऊन हे शहर तिरुपतीसारखे होण्यास पाच वर्षांचा अवधी लागेल.
मात्र, अयोध्येत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यासाठी तातडीने निर्णय होतील, जेणेकरून एप्रिल २०२० मध्ये रामनवमीपूर्वी उड्डाणे सुरू होऊ शकतील. अयोध्या ते फैजाबाददरम्यान ५ किमी उड्डाणपूल असेल.
अयोध्येत उभारले जाणारे हे राममंदिर देशातील सर्वात मोठे देवस्थान असेल, असेही सिंह म्हणाले. मंदिर उभारणीसाठी ६५% शिळा तयार असून २ हजार कारागिरांनी रोज ८ तास काम केले तर अडीच वर्षांत मंदिर उभारेल.