अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेले अनेक मित्र सध्या अस्वस्थ आहेत. ते पक्ष सोडून गेल्याने त्यांची जागा पक्षातील तरुणांनी घेतली आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या मित्रांनी आता तिकडेच सुखी राहावे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणचेही नाव न घेता केली आहे.
सरकार स्थापनेनंतर बाळासाहेब थोरात प्रथमच जामखेडमध्ये आले होते. यावेळी सावळेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मधुकर राळेभात, ज्ञानदेव वाफारे, रमेश आजबे, प्रवीण घुले, बाळासाहेब साळुंके, रवींद्र कडलग, अमित जाधव, जमीर सय्यद, महादेव डुचे, मनोज भोरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, निवडणुकीपूर्वी अनेक मित्र, नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. पण, भाजपचे सरकार अल्पावधीत पडले. त्यामुळे ते सध्या अस्वस्थ आहेत. आपली फसवणूक झाली, असे ते सांगत आहेत.
मात्र, ते तिकडे गेल्याने त्यांची रिकामी झालेली जागा तरुणांनी घेतली आहे. त्यामुळे तिकडे गेलेल्यांना परत घ्यायचे की नाही, हे आता तरुणांनाच विचारावे लागेल. त्यामुळे काही दिवस त्यांनी तिकडेच राहावे, असे थोरात म्हणाले.