अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीचा सपाटा महावितरणने सुरु केला आहे. वीजबिल भरा अन्यथा विजकन्शेन कट करण्यात येईल, अशा धमक्या शेतकर्यांना दिल्या जात आहेत.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर महावितरणने आक्रमक वसूली सुरु केल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाली आहे. आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकर्यांचे शेतीपंपाचे संपूर्ण वीजबिल माफ करु.
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देऊ. अशी घोषणाबाजी करणार्या महाविकास आघाडी सरकारच्या या फक्त वल्गना ठरल्या आहेत. सततचा दुष्काळ, त्यानंतर झालेली अतिवृष्टी, यामधून बाहेर पडत नाही तोच आता हे शेतकर्यांवर आलेले वीजबिलाचे संकट, त्यामुळे शेतकर्यांमध्ये महाआघाडी सरकारविरुध्द मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
यंदा पाऊस पाणी भरपूर झाल्याने धरणं, विहीरी व कुपनलिकांची पाणी पातळी समाधानकारक आहे. म्हणूनच रब्बी हंगामात शेतकर्यांनी गहू, हरभरा, कांदा, ऊस आदी पिकांची लागवड केलेली आहे. सध्या उन्हाची तिव्रता वाढली असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाच्या तिव्रतेने रब्बी हंगामातील पिकांना वरचेवर पाणी लागत आहे.
शेतकर्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत महावितरणने वसुली मोहीम तीव्र केली आहे. वास्तविक पाहता शेतकर्यांना देण्यात येणार्या विजेबाबतचे वास्तव काही वेगळेच आहे. आठ तासांच्या वीजपुरवठ्यात दोन तासांपासून चार तासांपर्यंत वीजभारनियमन केले जाते.
म्हणजे प्रत्यक्ष वीजपुरवठा हा फक्त चारच तास उन्हाळ्यात केला जातो. मग प्रश्न असा उपस्थित होतो. जो एक महिना खाली शिल्लक राहिला, तोही राहत नाही. मग महावितरण शेतकर्यांकडून पैसे कशाचे वसूल करते? हा शेतकर्यांचा खरा सवाल आहे.