अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-गेल्या दहा दिवसांपासून कृषिपंपाच्या विद्युत रोहित्राची मुख्य केबल जळाल्याने पाथर्डी शहरातील चांदगाव रोड येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
जळालेली मुख्य केबल तातडीने बदलून मिळावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली विद्युत विभागाचे शहर अभियंता मयूर जाधव यांना देण्यात आले.
विशेष म्हणजे मागील महिन्यामध्ये येथील विद्युत रोहित्र जळाले होते. त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून स्वखर्चाने विद्युत रोहित्राची दुरुस्ती केली होती.
त्यावेळी देखील रोहित्र जळाल्याने तब्बल वीस दिवस शेतकऱ्यांना अंधारात काढावी लागली होती. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच पुन्हा रोहित्राची मुख्य केबल जळाल्याने परिसरातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
सध्या शेतीमध्ये तूर, ऊस, गहू, हरभरा, मका, कांदे आदी पिके आहेत. सुमारे महिनाभर विविध अडचणींमुळे चांदगाव रोड परिसरात विजेचा लपंडाव होत असल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत.
आसमानीसह आता सुलतानी संकट शेतकऱ्यांसमोर आल्याने परिसरातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. विद्युत विभागाने याची तातडीने दखल घेऊन जळालेली केबल नवीन टाकून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, जाधव यांनी तातडीने नवीन केबल टाकण्याचे आश्वासन दिले.