पक्षप्रवेशानंतरही आ. कांबळेंची वाटचाल बिकट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : आमदार कांबळे यांनी नुकताच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मातोश्रीवरून त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

उमेदवारी लादल्यास पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी दिला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्यापुढील समस्या वाढल्या आहेत.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार कांबळे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. मात्र, त्यांच्या शिवसेनेत झालेल्या प्रवेशाला विरोध नसल्याचेही सांगण्यात आले.

यावेळी अशोक थोरे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, सचिन कोते, नितीन पवार, अतुल शेटे, सुधीर वायखिंडे, संदीप दातीर, अमोल वमने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी देवकर म्हणाले, आमदार कांबळे यांनी माजी आमदार जयंतराव ससाणे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात या तिघांनाही फसविले आहे.

त्यामुळे त्यांच्यावर विश्वास नाही. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्याच मतदारसंघात त्यांना कमी मते पडली. इतरही अनेक सक्षम उमेदवार आहेत. त्यांचा प्रवेश व त्यांच्या उमेदवारीबाबत स्थानिक कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेण्यात आलेले नाही.

एवढेच नव्हे, तर खासदार सदाशिव लोखंडे यांनाही काही सांगण्यात आले नाही. त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी व सत्य परिस्थिती सांगण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत.

त्यासाठी १० हजार सह्यांचे निवेदनही सादर करून विविध संघटनांचेही पत्र देणार आहोत आणि तरीही उमेदवारी लादण्यात आलीच, तर विरोधात काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आमदार कांबळे यांच्याबरोबर काही पदाधिकारी मातोश्रीवर गेले होते.

त्यांनी ठाकरे यांच्यापासून वस्तुस्थिती लपविली. त्यांची दिशाभूल केली, अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाईचीही मागणी करणार आहोत. त्यांनी आमदार कांबळे यांच्याबरोबर एखादा मेळावा घेऊन दाखवावा, असे आव्हानही देवकर यांनी दिले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24