ब्रेकिंग

भिंगार सुगंधी तंबाखूचे आगार; एलसीबीने फक्त 27 हजाराची तंबाखू पकडली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- भिंगार शहरात सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला केवळ एकाच ठिकाणी सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आला.(Ahmednagar Breaking)

तोही २७ हजार ५२० रूपये किंमतीचा. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता भिंगार मधील सदर बाजारच्या पाठीमागे आर्मी रोडलगत एका पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस हवालदार दिनेश मोरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून साजित हमीद पठाण (वय ४२ वर्षे रा. झेंडीगेट) याच्याविरोधात भा.दं.वि. कलम १८८, २७२, २७३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुगंधी तंबाखूचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकातील पोलीस अंमलदार दिनेश मोरे, कमलेश पाथरूट, शंकर चौधरी, योगेश सातपुते यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी सुगंधी तंबाखु मिळुन आली. ती तंबाखू पोलिसांनी जप्त केली. दरम्यान मावा तयार करण्यासाठी सुगंधी तंबाखूचा उपयोग होतो.

याच सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात निर्मिती भिंगार मध्ये होते. तेथून जिल्ह्यात सुगंधी तंबाखूचा पुरवठा केला जातो. असे असतानाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केवळ एकाच ठिकाणी छापा टाकून २७ हजार ५२० रूपयांची तंबाखू जप्त केली. बड्या बड्या कारवाई करण्यात माहीर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने जुजबी कारवाई करून स्वतः चे हसू करून घेतले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office