अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: तालुक्यातील कोळपेवाडी येथील एका भोंदू बाबाने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांना वाममार्गाला लावल्याचे उघड झाले आहे. या बाबास अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने आज संगमनेर तालुक्यातील चिखली येथून ताब्यात घेण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सहासारी परिसरात राहणारा मल्ली अप्पा कोळपे (वय 35) याने कोपरगाव तालुक्यासह राज्यातील अनेक महिलांना लग्न जमवण्याच्या नावाखाली वाममार्गाला लावल्याचे उघड झाले आहे.
त्याने आतापर्यंत 42 महिला व मुलींना वाममार्गाला लावल्याचे उघड झाले आहे. ही माहिती संगमनेर तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ऍड. रंजना गवांदे यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी वेश बदलून कोळपेवाडी येथे भोंदू बाबाची भेट घेतली. त्याला माझी मुलगी आडचणीत आहे.
तिला तुमच्या मदतीने वाचवायचे आहे. यावर या भोंदू बाबाने योग्य ते क्रियाकर्म करण्याच्या सूचना केल्या. तसेच एका मुलाचा संदर्भ जोडून संबंधित मुलाच्या गावामध्ये जाऊन उर्वरित क्रिया करावी लागेल, असे गवांदे यांना सांगितले. गवांदे यांनीही त्याच्या सूचनेचे पालन करीत संबंधित घटनेची माहिती पोलीस यंत्रणेला कळवली.
पोलिसांच्या मदतीने पोलीस उपाधीक्षक रोशन पंडित यांच्या पथकासह काही पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील चिखली येथे साध्या वेशामध्ये जाऊन भोंदू बाबाच्या कर्मकांडची प्रत्यक्ष पाहणी करत त्याला रंगेहाथ पकडले. दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पथक त्याच्या पाळतीवर होते.
पुराव्यासह माहिती मिळताच पोलीस पथकाने छापा घालून भोंदू बाबा मल्ली अप्पा कोळपे याला ताब्यात घेतले. कोळपे याच्यावर रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कोळपे हा कोळपेवाडी परिसरात गेल्या अठरा वर्षांपासून भोंदूगिरी करून राज्यातील जवळपास 42 मुलींना वाममार्गाला लावल्याचे बोलले जात आहे.
तसेच तो मुला-मुलींसह इतर लग्नांची जुळवाजुळव करत होता. यातून काहींना पैसे घेऊन चुकीची जुळवाजुळव करीत असल्याचे बोलले जात आहे. एक उच्चशिक्षित मुलीची दिशाभूल करुन अस्तगाव येथील सातवी शिकलेल्या फिटरबरोबर जवळीक साधून दिली.
त्या बदल्यात त्याने संबंधित मुलाकडून पैसेही उकळल्याचे समजते. या उच्चशिक्षित मुलीला त्या मुलाकडून शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे कोपरगाव तालुक्यातील आपल्या वडिलांना तिने सांगितले. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी या घटनेची माहिती कोपरगाव तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांच्या कानावर घातली. संबंधित सदस्याने ऍड. रंजना गवांदे यांच्याकडे तक्रार केली.