अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- करोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्यातील जनतेला एक सूचक इशारा दिल्याचं दिसून आलं.
राज्यात जर ७०० मेट्रीक टन पेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं अजित पवार यांनी बोलून दाखवलं आहे.
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, “करोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच घेतात. त्याच्याबाबतची नियमावली मंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे.
परंतु रूग्ण संख्या वाढत आहे, बहुतेक जण घरीच थांबून उपाचार घेत आहेत. त्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे.
परंतु, हे सगळं होत असताना उद्या जर ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्याप्रमाणावर सुरू झाली आणि ७०० मेट्रीक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची राज्यात मागणी झाली तर मग मात्र त्या संदर्भात मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
तसेच, पंतप्रधानांच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सध्या भाजपाकडून सुरू असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “प्रत्येक वेळेस बैठक घेतली म्हणजे प्रत्येकाने उपस्थित राहीलं पाहिजे असं नाही.
कधी कोणाला अडचण असते, कधी कोण करोनामुळे विलगिकरणात असतं किंवा आणखी काही कारण असतं. त्याबद्दल स्वत: मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जे नेहमी मुख्यमंत्र्यासोबत अशा बैठकीस असतात याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे संबंधित सल्लागार, सचिव अन्य महत्वाची लोक या बैठकीला हजर होते.
कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती की आपल्याकडे लस तुटवडा आहे, १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देताना लस तुटवडा जाणवत आहे.
त्यामुळे तशा पद्धतीची बैठकीत मागणी झाली. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही.