अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मोठ्या कालावधीनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ खुली झाली होती; मात्र त्यासाठी प्रशासनाने काही नियम घालून दिले होते; मात्र बाजारपेठ खुली झाल्यानंतर या नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद होती. त्याप्रमाणे श्रीरामपूरची बाजारपेठही बंद होती. मोठ्या कालावधीनंतर लॉकडाऊनमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी सातत्याने केली होती.
तीस प्रतिसाद देत प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी काही नियम घालून देऊन बाजारपेठ खुली केली होती. यावेळी दुकानदारांनी व पालिका प्रशासनाने गर्दीचे व इतर नियम पाळणे अपेक्षीत होते; मात्र तसे न झाल्याने शेवटी बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे.
याबाबत श्रीरामपूरच्या तहसीलदारांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, की श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीत लॉकडाऊनचे पूर्णपणे पालन झाले.
त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. तथापि शासनाच्या सुधारीत आदेशानुसार आर्थिक उलाढाली सुरू होणे आवश्यक असल्याने सोशल डिस्टन्सिंग अबाधित राहून शासनाच्या आदेशाच्या अधीन राहून इतर दुकाने उघडण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
त्या अनुषंगाने आपण शहरातील दुकाने सुरू करण्याचा आदेश दिला आहे; मात्र मागील तीन दिवसांत असे निदर्शनास आले आहे, की गावातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
तसेच दुकानांसमोर ग्राहकांचे सोशल डिस्टन्सिंग राखण्यात दुकानदारांना पालिका प्रशासनाला मर्यादा येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दीर्घकाळ रोखून ठेवलेला कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव श्रीरामपूर शहरात व तालुक्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याने बाजारपेठेतील दुकाने बंद करावी, असे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com