नमस्कार,
समाजाला उद्देशून माझं हे पत्र आहे. मी कोण? माझं नांव काय? प्लीज.. नका विचारू. भावना समजून घेतल्या तरी खूप झालं..मी एक डॉक्टर आहे. खेड्यातला.. माझी कोरोना पॉझिटिव्ह पत्नी आपल्या नगर शहरातील एका खासगी covid-19 रुग्णालयात उपचार घेत आहे. पाच-सहा दिवस झाले असतील, तिची प्रकृती उत्तम आहे. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. आणि मी तिच्या काळजीपोटी हॉस्पिटलच्या आवारात एका बाकड्यावर बसून आहे. कारण मला आत जाण्याची परवानगी नाही.
नुसतं बसून काय करणार? म्हणून मग माझं ऑब्झर्वेशन सुरू आहे. इथे काय चाललंय? पॉझिटिव्ह पेशंट कसे येतात? डॉक्टर त्यांना कसं ऍडमिट करून घेतात? काय सल्ला देतात? बाकीची व्यवस्था कशी आहे? अशा सगळ्या बाबी मी बारकाईने पाहत आहे..
सगळं खूपच धक्कादायक आहे..!
यस्स.. धक्कादायक म्हटल्यावर तुमचे डोळे नक्कीच लकाकले असतील. कोणाच्यातरी विरोधात, काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल असे तुम्हाला वाटले असेल हे नक्की! कारण चांगले काही असते, यावर तुमचा विश्वासच नाहीये ना..! पण नीट वाचा मी काय सांगतोय ते..तारीख होती 11 जुलै. एक रुग्ण आणि त्याची पत्नी असे दोघे आले. दोघेही तरुण होते. रुग्णाच्या चेहऱ्यावर अजिजीचे भाव. दुसऱ्या कुठल्याच हॉस्पिटलला ॲडमिट करून घेत नव्हते, म्हणून इथे आले. डॉक्टरांनी रिपोर्ट बघितला आणि थेट कोव्हिड-१९ वॉर्डमध्ये पाठवून दिले. ऍडमिट करून घेतले. त्यांची पत्नी माझ्या समोरच्याच बाकड्यावर दिवसभर बसलेली. डोळ्यात पाणी.
दुपारी रुग्णांसाठी जेवणाचे डबे आले. ही सर्व व्यवस्था हॉस्पिटलने केलेली आहे.. हे विशेष..! कारण काय तर रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास नको. इथे त्यांची चांगली काळजी घेतली जावी, सकस आहार मिळावा, हा त्यामागचा उद्देश..हॉस्पिटल मधले एक प्रमुख डॉक्टर खाली आले, तेंव्हा त्यांनी त्या महिलेला तिथे बसलेले पाहिले. त्यांचा रिपोर्ट अजून यायचं होता. मग त्यांच्या लक्षात आलं की, त्यांनी काही खाल्लं पण नाही. डॉक्टरांनी लगेच जेवणाचे एक ताट मागून घेतले. आणि त्या माऊली समोर धरले. तिच्या डोळ्यात तर आणखीनच अश्रू येऊ लागले. ‘ताई तुम्ही खाऊन घ्या. काळजी करू नका’, असं ते त्यांना सांगत होते.
जवळपास तीन दिवस सकाळचा नाष्टा, चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळी एक चहा आणि रात्रीच जेवण त्या ताईंना हॉस्पिटलकडून दिलं गेलं. मलाही विचारलं होतं. पण मला वाटलं हे बहुतेक त्याचेही पैसे उकळतील. म्हणून मी घरून डबा मागवत होतो.! पण नंतर डॉक्टरांशी बोलताना लक्षात आलं की हे जेवण त्यांनी मोफत दिलं होतं त्या बाईंना.. कारण काय तर अशा दुःखी मन:स्थितीत त्या एकट्या कुठे जातील? कुठे जेवतील? असा मानवतावादी प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी कसलाही विचार न करता हे जेवण त्या बाईंना देण्याची व्यवस्था केली.
इतकंच नाही तर घरी जाता येत नाही म्हणून तिथेच रात्री बेड देऊन त्यांच्या निवासाची सुद्धा व्यवस्था केली. एका रुग्णाचा रात्रीचा डबा मी सहज पाहिला तर त्याच्यामध्ये एका ग्लासात चक्क ‘हळदीचं दूध’ होतं. मला खूपच आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. अधिक चौकशी केली तेव्हां असं कळलं की रात्रीच्या जेवणात सर्व रुग्णांना हॉस्पिटल कडून एक ग्लास हळदीचे दूधही दिलं जातं. कारण त्यांच्यातली रोगप्रतिकारशक्ती विकसित व्हावी म्हणून.. आहे ना धक्कादायक!
तिसऱ्या का चौथ्या दिवशी त्या बाईंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांना घरी जायला सांगितलं. त्या हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर पडल्या आणि तेवढ्यात त्यांना पुन्हा फोन आला की तुमची दहा वर्षाची मुलगी पॉझिटिव आहे. रात्रीचे अकरा वाजले होते. बाईंना तर काय करावे तेच सुचेना.. वीस किलोमीटर दूरवर त्यांचं घर. नवरा ऍडमिट. घरी पोरगी आणि सासू आता मी काय करू आणि कसं करू? असं म्हणत त्या धाय मोकलून रडत होत्या.
हॉस्पिटलची ऍम्ब्युलन्स दारात उभी होती. डॉक्टरांनी घरचा पत्ता घेतला आणि साडेअकरा वाजता मुलीला आणण्यासाठी स्वतःची ऍम्ब्युलन्स पाठवून दिली. तासाभरात दहा वर्षाची ती चिमुकली पोर वॉर्डमध्ये ॲडमिट झाली आणि उपचारही लगेच सुरू झाले.
या एकूण सर्व प्रक्रियेत माझ्या कानावर एकदाही असं आलं नाही की ‘तुम्ही आधी पैसे भरा आणि मग ॲम्बुलन्स घ्यायला जाईल’. पैशाचा कुठेच विषय देखील निघाला नाही. हा एक दुसरा मोठा धक्का होता…! डॉक्टरांचे आभार कसे मानावेत हे त्या माउलीला ही समजत नव्हतं..हॉस्पिटलमधले ते २५/३० वर्षांचे कोवळी डॉक्टर पोरं आपला जीव धोक्यात घालून, घेतलेलं वैद्यकीय ज्ञान पणाला लावून, कोरोनाशी लढण्यासाठी स्वतःला झोकून देत होते आणि ते मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पहात होतो..अनुभवत होतो.
दोन-तीन दिवस असेच गेले. आता बाईंच्या नवऱ्याची प्रकृती चांगली झाली होती आणि त्याच्यापुढे बिलाचा प्रश्न आला. डिस्चार्ज मात्र अजून झालेलाच नव्हता. सुरुवातीचे चार ते पाच दिवस या हॉस्पिटलने त्या रुग्णाकडून एक रुपया देखील भरून घेतलेला नव्हता. माझा मेडिक्लेम आहे हे असे रुग्णाने सांगितल्यानंतर तसा प्रस्ताव देखील पाठवलेला. परंतु त्याला मंजुरी येईपर्यंत तुम्ही अनामत रक्कम भरा असे प्रशासन सांगत होते आणि पेशंट काही ऐकत नव्हता. अनामत रक्कम ही रुग्णालयाचे बिल इन्शुरन्स कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर किंवा मंजुरी आल्यानंतर परत केले जातेआणि हा सगळा कागदोपत्री व्यवहार रुग्ण ज्यावेळी डिस्चार्ज होतो, त्याच वेळी पूर्ण होतो. या रुग्णाचा डिस्चार्ज अजून व्हायचा होता.
रुग्णाने पाचव्या दिवशी काही रक्कम भरली. ती भरताना बरीशी बडबडही केली. हॉस्पिटल केलेले उपचार गाढवाच्या…त गेले, असे तेथे भाव होते. इतकेच कशाला? एका स्थानिक वर्तमानपत्रातील पत्रकाराला त्याच हॉस्पिटलच्या वॉर्ड मधून फोन करून पैशासाठी कशी लुबाडणूक केली जाते, हे खोटेच हे सांगून टाकले आणि संध्याकाळी कुठलीही शहानिशा न करता त्या पत्रकाराने ती बातमी प्रसिद्धही करून टाकली.
प्रत्यक्षात रुग्णाच्या पत्नी आणि मुलीच्या बाबतीत हॉस्पिटलने माणुसकी दाखवून किती सहकार्य केले, याची पुसटशी कल्पना, बेडवर बसून सोशल मीडियावर टाईमपास करणाऱ्या त्या रुग्णाला नव्हती. किंवा दोन पैसे वाचत असतील तर ती समजून घेण्याची इच्छा पण नव्हती. इतकी गुर्मी आणि मग्रुरी त्या रुग्णाच्या चेहऱ्यावर होती आणि ती सतत त्याच्या बोलण्यातून डोकावत होती.
मी संध्याकाळी बाकड्यावर बसून तेच वर्तमानपत्र वाचत होतो आणि ती बातमी वाचून मला तर धक्काच बसला आणि खूप संतापही आला. दोन कानाखाली वाजवण्याची इच्छा झाली. पत्रकार म्हणून एवढीच तुम्हाला काळजी आहे, तर तुम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये येऊन प्रत्यक्ष पहात का नाही? कुणीतरी फोनवर काहीतरी चुकीची माहिती देत आहे आणि कसलीही शहानिशा न करता आपण ती खुशाल प्रसिद्ध करतोय. यातून कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस वॉर्ड बॉय आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच यांच्या भावनांना आपण ठेच पोहोचतो आहोत, याची साधी कल्पना यांना येऊ नये.. त्याची जाणीव देखील असू नये? हे खूप मोठे दुर्दैव आहे.
याच हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर्स, दोन नर्सेस आणि शहरातील इतरही खाजगी हॉस्पिटल्स मधील काही डॉक्टर्स पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यावरही उपचारांची गरज आहे. रुग्णासाठी जीव धोक्यात घालून स्वतःला कोरोना संसर्ग करून घ्यायचा. उपचारासाठी पैसे स्वतः खर्च करायचे आणि वरतून पुन्हा बऱ्या झालेल्या रुग्णांकडून शिव्या खायच्या..हा काय प्रकार आहे.. कुठं फेडणार आहेत ही पापं..?
कोरोना पेशंट म्हणून ऍडमिट होताना पैसे भरण्याची तयारी होती ना.. मग आपल्या वर आलेली वेळ निघून गेली की माणसं कशी दुसऱ्याला शिव्या देऊन पैशांचं देणे टाळण्याचा प्रयत्न करतात, याचं हे धडधडीत उदाहरण आहे. हॉस्पिटलने या पेशंटला आमंत्रण देऊन ऍडमिट होण्यास सांगितलं असतं तर गोष्ट वेगळी होती.मी या सगळ्या घटनेचा साक्षीदार आहे.
ही सगळी घटना घडल्यानंतर त्या डॉक्टरांच्या चेहर्याकडे पाहिलं. तर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. गदगदलेल्या स्वरात ते आपल्या सहकारी डॉक्टरांशी बोलत होते. इतकं चांगलं करूनही जर असेच होणार असेल तर आपण हे कोव्हिड हॉस्पिटल बंद करायचं का? असा सल्ला ते त्यांच्या सहकाऱ्यांना विचारत होते आणि मी शेजारीच उभा राहून त्यांचं संभाषण ऐकत होतो. प्रचंड राग आला. संताप झाला. समाजातल्या या सो कॉल्ड विकृत लोकांना या सत्य परिस्थितीची जाणीव झालीच पाहिजे म्हणून हे सर्व लिहिण्याचे धाडस मी याठिकाणी करतो आहे.
माझा दुसरा कोणताही उद्देश नाही. मी कोण आहे? हे त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना देखील माहित नाही. मी जे पाहिले, जे सत्य अनुभवले तेच मी लिहिले आहे. आज जर हे हॉस्पिटल बंद झालं तर तुमच्या- माझ्यासारख्या रुग्णांनी उपचारांसाठी कुठे जायचं? सरकारी रुग्णालयात तर खाटा शिल्लकच नाहीत. मग करायचं काय? रस्त्याच्या कडेला पडून असंच मरून जायचं का? असे प्रश्न माझ्यापुढे उभे राहिले. म्हणून मी हे धाडस केले..
वैद्यकीय व्यवसाय हा एक भाग झाला. परंतु या कोरोनाच्या महामारीमध्ये वैद्यकीय क्षेत्राशिवाय माणसांना जिवंत ठेवणार दुसरं क्षेत्र तरी आहे कोणतं? बरं ही सगळी माणसं यंत्रमानव तर नाहीत ना! ती सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच हाडामांसाची माणसे आहेत. त्यांनाही भाव भावना आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते सुद्धा आजारी पडू शकतात. रुग्णांवर उपचार करण्यासाठी पैसेच लागतात..याची जाणीव आपल्या समाजाला का होत नाही हेच कळत नाही..
कुणीतरी भामटा उठतो. पैसे भरायचे नाहीत म्हणून राजकीय नेते, पत्रकार यांना फोन करतो आणि ती माणसं थेट डॉक्टर, हॉस्पिटल व्यवस्थापनावर आरोप करून मोकळे होतात.. हा काय प्रकार आहे? अरे थांबवा हा प्रकार. तुम्हाला स्वतःला जर काही करता येत नसेल, तर जे कुणी ते करत आहेत त्यांना मदत करण्याची भावना ठेवा. त्यांना सहकार्य करा. निदान नाऊमेद तरी करू नका रे बाबांनो..!
सध्या नगरमध्ये अशा पद्धतीने डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला बदनाम करण्याचं मोठं कारस्थान सुरू झालेले दिसते आहे. लोक खरंच भामटी असतात. पैसे द्यायची वेळ आली की त्यांना नको नको होतं आणि उपचार करून घ्यायची वेळ येते, तेंव्हा हाता पाया पडायला तयार असतात.एखादा डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून उपलब्ध साधन सामग्री नुसार तुमच्यावर उपचार करतो, तेंव्हा त्याचा काही ना काही तरी खर्च येणारच ना.. तुम्ही विश्वास नको का ठेवायला.. एक दमडी भरायची नाही आणि उपचार मात्र फाईव्हस्टार पाहिजेत ही फडतुस अपेक्षा कशाला..
आज जिथे कोरोना रुग्णांवर उपचार करायला डॉक्टर्स धजावत नाहीत, तिथे या हॉस्पिटल मधला सर्व स्टाफ, मुख्य डॉक्टर नर्सेस, मावश्या अशी सर्व मंडळी मनापासून काम करत आहेत. जेवणासाठी उत्तम असा डबा याठिकाणी दिला जातो आहे. मला तर त्यामागे कुठलाही व्यवसायिक हेतू दिसत नाही.सामाजिक जाणीवेचा भाव दिसतो आहे आणि या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये हे माणुसकी दिसते आहे. कारण येथे होणारे सर्व उपचार पूर्णतः शासकीय दरानेच केले जातात. आता या दरांमध्ये जेवणाच्या डब्याचा खर्च समाविष्ट असेल का? याचा विचार तुमचा तुम्हीच करा रे.. मग कोण करते आहे हा खर्च.. जरा डोकं चालवा.. विचार करा.. मित्रांनो..
मग आता मला सांगा. दिवसभर डॉक्टरांना कोरोना योद्धा म्हणून त्यांचा गौरव करायचा आणि काही लोकांनी एसी केबिनमध्ये बसून कोणाच्यातरी ऐकीव माहितीवर, नाव न घेता हॉस्पिटलला घोडा लावून मोकळं व्हायचे हा कुठला प्रकार..? सध्याची परिस्थिती काय? प्रशासन, डॉक्टर अशा परिस्थितीत काम करताहेत.. याचं थोडं तरी भान असू द्या. हातात पेन दिला म्हणून काहीही लिहायचं आणि एखाद्याचं मनोधैर्य खच्ची करायचं हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? हे आज मला याठिकाणी विचारावसं वाटतं आहे.
म्हणून मी म्हणतोय. इथून पुढच्या काळात जर कोणत्या हॉस्पिटलने कोरोना पेशंटवर उपचारच करायचे नाहीत, असं ठरवून हॉस्पिटलच बंद केलं तर.. आपल्याला ते काय भावात जाईल..म्हणून प्लीज प्लीज.. ‘ वाटल्यास मला दोन हाणा’ पण आता डॉक्टरांना कोरोना योद्धा म्हणू नका. कारण तुमची ती लायकी नाही. तुम्ही स्वतःलाच व्हाट्सअप आणि फेसबुक विद्यापीठातून कोरोनाचे इतके मोठे महान तज्ञ झालेला आहात, की सगळ्या गोष्टी आता तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या आहेत. त्यामुळे प्लीज इथून पुढे कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊ नका. घरच्या घरीच काढा प्या.. गरम पाणी प्या..वाफ घ्या आणि एकदम व्यवस्थित रहा तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत..
बस झाले.. आता माझ्या पत्नीला डिस्चार्ज दिला हॉस्पिटलने. त्यांचे संपूर्ण बिल भरून मी आता तिला घेऊन घरी जातो आहे. आम्ही दोघेही खूप समाधानी आहोत. आनंदी आहोत. आमच्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि आणि व्यवस्थापन यांचा मी अतिशय मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी केवळ शरीरावरच उपचार नाही केले तर, आम्हाला मानसिक आधार दिला, धीर दिला आणि म्हणूनच आम्ही आता पूर्णपणे बरे झालो आहोत..
आपलाच
एक सामान्य माणूस