थोडंसं मनातलं : कितीही कठीण प्रसंग आला तरी आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नमस्कार मित्रांनो,
भारत देशातील लोकांना कायमच अस्मानी सुल्तानी संकटांना सामोरे जावे लागले आहे. कधी निसर्गाचा कोप तरी कधी विषाणू चा उन्माद. आता आपला भारत देश कोरोना सारख्या महामारी ला सामोरे जात आहे. अनेक वेळा माणूस नैराश्य आल्यावर काहीच सुचत नाही म्हणून शेवटी आपला जीव देतो. पण एक प्रश्न ऐरणीवर आला आहे की, काय आत्महत्या हा शेवटचा पर्याय आहे?भारतात अनेक शेतकरी कधी नापिकीला कंटाळून, तर कधी निसर्गाचे कोपामुळे , तर कधी कर्जाचा डोंगर उभा राहिला म्हणून , तर कधी कधी वेगवेगळ्या आजाराचा सामना करताना आत्महत्या करताना आढळले.

असाच काहीसा प्रकार उच्चपदस्थांना पण सतावत आहे. अनेकदा प्रतिष्ठा, पत्रकार,पैसा, प्रेम प्रकरण आणि इतर काही अडचणी मुळे आत्महत्या केल्याची उदाहरणे समोर आले आहेत. परमेश्वराने इतके सुंदर जीवन फुकट दिले आहे आणि माणूस त्याची विल्हेवाट अशा आत्महत्या करून लावतात हेच मुळात चुकीचे आहे. आज या विज्ञानाच्या युगात प्रत्येक बाबतीत काही तरी उपाय निघतोच. पण तो पर्यंत थांबण्याची तयारी माणसाची नसते. मनुष्य जन्म एकदाच आहे. त्यामुळे या जन्मी तरी अशी महाभयंकर चुक माणसाकडून होता कामा नये. बरं आत्महत्या केल्याने प्रश्न सुटण्याऐवजी गुंता आणखीनच वाढत जातो. त्यामुळे आत्महत्या हा शेवटचा पर्याय असुच शकत नाही.
आता पर्यंत महाराष्ट्रात अनेक शेतकरी, नेते,अधिकारी, अध्यात्मिक गुरू,चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, प्रेमवीर, आणि इतर क्षेत्रातील काही कर्मचारी यांनी सुध्दा आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.

माणसाला अजुनही त्याच्या मर्यादा कळल्या नाहीत असाच काहीसा अर्थ निघतो. आजाराला कंटाळून पोलिस अधिकारी हिमांशु राॅय यांनी आत्महत्या केली तर अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांनी घरातील कलहामुळे आत्महत्या केली. यापूर्वी सिनेसृष्टी मधील अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री यांनी नैराष्य आले म्हणून, तर काहीनी व्यसनाधिन होऊन तर काहीनी प्रेमात असफल झाले म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेतच. काही मुलं परीक्षा चे पेपर अवघड गेले म्हणून आत्महत्या करतात तर काही मुलं आपल्या मागण्या आईवडील पुर्ण करू शकत नाहीत म्हणून आत्महत्या करतात. आत्ताच काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूत नावाच्या तरुण अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु असे कोणी सेलिब्रेटिजनी आत्महत्या केली तर प्रत्येक चॅनल वर दिवसभर बातमी दाखवली जाते.

त्याची मागची पुढची सर्व माहिती दिवसभर चॅनल दाखवतात. पण माझा जगाचा पोसींदा बळीराजा रोज मरतो पण त्याचे बाबतीत कुठे ही उल्लेख येत नाही किंवा सरकार कडून सुद्धा सांत्वन केले जात नाही ही खटकणारी गोष्ट आहे. अर्थात जे सेलिब्रेटि लोक आत्महत्या करताना त्यांचेवर खरच कोणतेही अस्मानी किंवा सुल्तानी, किंवा नैसर्गिक संकटे आलेले नसतात. फक्त त्यांचे चोचले पुर्ण होत नाहीत, प्रसिद्धीच्या झोतात असताना केलेल्या लफड्या मुळे नैराश्य येते आणि हे लोक आत्महत्या करतात. पण तरीही त्यांनी फार देशावर उपकार केल्या सारखे दिवसभर टिव्ही चॅनल बातमी दाखवतात हे दुर्दैव आहे.

खरं तर हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक असे अभिनेते आहेत की, देशावर संकट आल्यावर ते खंबीरपणे देशातील तमाम जनतेला मदत करतात. उद्योगपती आदरणीय रतनजी टाटा, नाना पाटेकर, अक्षयकुमार, मकरंद अनासपुरे, अजय देवगण , सोनू सूद हे आणि असे अनेक लहान मोठे कलावंत व दिग्दर्शक, निर्माते देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचे वेळी आपापल्या परीने जसे जमेल तशी मदत करतात. अर्थात ज्या अभिनेता किंवा अभिनेत्री यांनी आत्महत्या केली ते कलाकार वाईट होते असे नाही, पण फक्त आत्महत्या हाच पर्याय नाही हे त्यांना कळले नाही हेच दुर्दैव आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अगदी उमेदीच्या काळात त्यांनी अशा प्रकारे आत्महत्या करून आपल्या कुटुंबियांना किती यातना होत असतील याचा विचार करणे आवश्यक होते. माझा बळीराजा कधी कधी कर्जाचा डोंगर उभा राहिला म्हणून, तर दुष्काळात पिक आले नाही म्हणून आत्महत्या करतो. पण आत्महत्या करताना आपल्या पाठीमागे परिवाराची काळजी कोण घेणार असा साधा विचारही कधी करत नाही. जीवनात अनेक वेळा माणसाला नैराश्य येते हे खरे असले तरी आत्महत्या करण्यापूर्वी कोणाजवळ तरी मन मोकळं करणे आवश्यक आहे.

त्यातुन नक्की काहीतरी पर्याय निघु शकतो की ज्या मुळे आत्महत्या करण्यापासून माणुस वाचवला जाईल. खर म्हणजे माणसाचे समोपदेशन होणे फारच आवश्यक झाले आहे. किरकोळ कारणावरून आत्महत्या करणे योग्य नाही. आता तर कोरोना झाल्याचे वाटल्याने सुद्धा काही लोकांनी आत्महत्या केली आहे. आपला देश सध्या कोरोनाचा सामना करत आहे. जनता सुरक्षित रहावी म्हणून अनेक कोरोना योद्धे बळी गेले आहेत आणि काही कोरोना योद्धे अजुनही लढत आहेत.

अशा परिस्थितीत संयमाने घेतले पाहिजे असे वाटते. त्यामुळे नागरिकहो आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी. मनुष्य जीवनाचे सार्थक करा आणि सुरक्षित रहा. मित्रांनो आत्महत्या हा शेवटचा पर्याय कधीच नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. हे जीवन सुंदर आहे, जीवनाचा पुर्ण उपभोग घेत जगायला शिकले पाहिजे. शेवटी जन्माला आलेला जीव एक ना एक दिवस जाणारच आहे हेच एकमेव अटळ सत्य असले तरीही आपणच आपला जीव घेऊ नका हिच विनंती. धन्यवाद.

ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24