अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-दुकानातून मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
मोबाईल चोरी प्रकरणी मोईन मोहम्मद पठाण (वय 21 रा. डावखररोड बसस्थानक मागे, ता. श्रीरामपूर), बंटी अमर सिंग (वय 24 मूळ रा. धानुकापूर जि. भिंड, राज्य मध्यप्रदेश, ह. रा खैरेचाळ स्टेशन रोड अहमदनगर) यांना अटक केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहता येथे शिवम ट्रेडिंग भुसार मालाच्या दुकानातील काऊंटरवरून रेडियम 6 कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांना सदरचा गुन्हा हा मोईन पठाण याने व त्याचे साथीदार यांनी केल्याची माहिती मिळाली.
या माहितीनुसार पोलीस पथकाने मोईन पठाण व बंटी सिंग या दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलिस खाक्या दाखवताच दोघांनी साथीदार बाबर चाॅद मोहम्मद शेख (रा. वॉर्ड नं 1 हुसेननगर ता. श्रीरामपूर) असे तिघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली व चोरलेला मोबाईल काढून दिला.
आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी राहता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.