रांची : ‘जगातील कोणतीही शक्ती अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यापासून रोखू शकत नाही’, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी झारखंडच्या पंडू येथे आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केले.
फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली राफेल विमाने सीमेपलीकडील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
‘सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत भगवान श्री रामाचे मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आता अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जाईल. जगातील कोणतीही शक्ती या मंदिराचे बांधकाम अडवू शकत नाही’, असे राजनाथ सिंह म्हणाले.
यावेळी त्यांनी ‘कलम ३७०’ व राफेल विमान सौदा देशहितात असल्याचाही दावा केला. ‘१९५२ मध्ये जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशात दोन संविधान, दोन पंतप्रधान व दोन राष्ट्रध्वज मान्य नसल्याचे म्हटले होते. केंद्रातील भाजप सरकारने आज त्यांचे स्वप्न सत्यात उतरवून आपले आश्वासन पूर्ण केले’, असे ते म्हणाले.