Ahmadnagar breaking : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या विद्युत तारा ओढताना अभियंत्यांना अटकाव करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी सात जणांविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दीपक कैलास सिंग यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, सिंग हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत बाभळेश्वर येथील वाहिनी बांधकाम उपविभागात सहाय्यक अभियंता म्हणून काम करतात.
महापारेषण यांची विविंड करंजी डोंगर ते भेंडा दरम्यान २२० के.व्ही.च्या विद्युत वाहिणीचे काम चालु आहे. या वाहिणीच्या दरम्यान येणाऱ्या शेती, जमीन मालक यांचा यापूर्वी सव्हें झाला असून ज्यांच्या शेतामधून वीज वाहक तारा तसेच मनोरा जाणार आहेत, त्यांना विद्युत पारेषण कंपनीकडून जमिन व पिकाची नियमाप्रमाणे नुकसानभरपाई काही शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. काहींना देणे बाकी आहे.
पंचनाम्याची कार्यवाही कंपनीमार्फत सुरू आहे. मात्र शेतकरी वाढीव भरपाईची मागणी करत आहेत. उर्वरीत लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे वेळोवेळी सांगण्यात आले होते. तरी संजय बंडु तुबे व कमलेश नवले (दोघे, रा. सौंदाळा) हे वेळोवेळी कामकाजात अटकाव करत असतात.
सोमवारी (दि. १२) लाईनच्या कामकाजाकरीता शासकीय नियमाप्रमाणे नेवासा पोलीस ठाण्यात सशुल्क पोलीस बंदोबस्त घेऊन तारा ओढणीचे काम चालु होते. त्यावेळी तेथे फिर्यादी सिंग तसेच महापारेषण कंपनीचे आकाश शंकर हुच्चे (सहाय्यक अभियंता), संतोष दगडु लांडे (सहाय्यक तंत्रज्ञ), रोहित राजेंद्र नागपुरे (तंत्रज्ञ), प्रकाश कश्यप, सतिष ठोके, विजय दंभाडे, शिमोन घोरपडे, पोलीस स्टाफ, तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
सोमवारी (दि.१२) दुपारी ३ वाजेच्या सुमारास तेथे संजय बंडु ठुबे, कमलेश नवले, दत्तात्रय भाऊसाहेब पंडित (सर्व रा. सौदाळा) तसेच स्थानिक शेतकरी तुकाराम भानुदास पेहरे, लक्ष्मण कचरु पेहरे, रामभाऊ कचरु पेहरे, अमोल चौधरी, निलेश शिंदे (सर्व रा. रांजणगाव देवी) व इतर चार ते पाच अनोळखी इसम असे येऊन, “तुम्ही उर्वरीत कामाचा आर्थिक धनादेश आम्हाला कधी द्याल ते लिहून द्या.
आम्हाला मोबदला भेटल्याशिवाय काम करुन देणार नाही,” असे म्हणुन आमच्या जाण्या येण्याच्या रोडमध्ये ट्रॉली आडवी लावुन आमच्यावर दबाव आणण्यासाठी त्यातील दोघांनी मोबाईलमध्ये व्हीडीओ रेकॉर्डीग करून आमच्या कामकाजात अटकाव केला व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.