अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- शहरातून एका वर्षात ९० व्यक्ती बेपत्ता होतात, त्यांचा तपासही लागला नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश गोंदकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव निलेश कोते यांनी पत्राद्वारे केली आहे.
गोंदकर व कोते म्हणाले, शिर्डी हे साईबाबांमुळे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. देश-विदेशातील साईभक्त येथे दररोज येतात. दररोज ६० हजारांच्या पुढे तर सलग सुट्यांच्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत येतात.
या ठिकाणाहून अनेक साईभक्त बेपत्ता होतात. रितसर पोलीस तक्रार देवूनही त्याचा तपास लागत नाही. अशा प्रकारांमुळे भाविक शिर्डी शहरात किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न इंदूर येथील साईभक्त मनोजकुमार सोनी यांनी उपस्थित केला आहे.
सोनी हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. सोनी हे २०१७ मध्ये सपत्नीक साईबाबांच्या दर्शनसाठी आले होते. तेव्हा त्यांच्या पत्नी बेपत्ता झाल्यावर आजतागायत त्या सापडल्या नाहीत.
तेव्हा त्याननी २०१७ ते २०१८ या कालावधीत शिर्डीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती घेतल्यावर किती व्यक्ती बेपत्ता झाले यासंदर्भात माहिती समजली. यात महिला, लहान मुले-मुली जास्त आहेत. त्यात सोनी यांच्या पत्नीचाही समावेश होता.
या बेपत्ता व्यक्तींचा तपास लागत नसल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात. मानवी तस्करी व अवयव चोरीचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे येणाऱ्या साईभक्तांवर त्याचा परिणाम होवू शकतो.
त्याचा चुकीचा संदेश जातो. एक तर शिर्डीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. येथील नागरिकांबरोबरच साईभक्तदेखील सुरक्षित नाहीत, हेच वरील घटनेवरून दिसून येते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून याची सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे.