अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-कृषी कायद्यावरून संसदेत रणकंदन सुरू असतानाच आज आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं असून, देशभरात तीन तास आंदोलन केलं जाणार आहे.
कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही मोर्चानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे.
देशभर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर आज (६ फेब्रुवारी) दुपारी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे. दिल्ली वगळता देशात इतरत्र तीन तास चक्का जाम करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या काळात शाळेच्या बस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आलेलं आहे. किसान मोर्चाने ही माहिती दिली आहे. ‘चक्का जाम’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मोठा फौजफाटा तैनात करण्याबरोबरच रस्तेही बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, चक्का जाम आंदोलन नसून, भारत बंद असल्याच्या अफवाही सोशल मीडियातून पसरवल्या जात असल्याचं समोर आलं आहे. १२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.
उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये चक्का जाम आंदोलन ककेले जात नाही. उर्वरित देशभरात आंदोलन होत असून, अत्यावश्यक सेवेतील आणि शाळेच्या बस व रुग्णवाहिकांना जाऊ देण्याचे निर्देश संयुक्त मोर्चाने आंदोलकांना दिले आहेत.