थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयात बदल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- राज्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपा सरकारच्या अनेक निर्णयांना ब्रेक लागला गेला आहे.

यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जीवनाशी जोडला गेलेला महत्वाचा विषय म्हणजे थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया आता पुन्हा बदलणार असून, पूर्वीप्रमाणे सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार आहे.

या निर्णयामुळे ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र निर्माण झाले आहे. सन २०२० मध्ये जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार असल्याने या निवडणुकांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.

राहुरी तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे. भाजपा सरकारने सन २०१६ मध्ये थेट जनतेतून सरपंच निवड पद्धत लागू केली होती. तसेच नगराध्यक्ष निवडही त्याच पद्धतीने केली जात होती. या निर्णयामुळे अनेक ठिकाणी मोठे बदल जाणवू लागले.

प्रस्थापित पुढारी बाजूला करून काम करणाऱ्या व्यक्तीला पदावर काम करण्याची संधी संपूर्ण गावाच्या माध्यमातून प्राप्त झाली. परंतु, अनेक ठिकाणी सरपंच एका गटाचा व सदस्य दुसऱ्या गटाचे असे चित्र देखील निर्माण झाले. विकास कामे करताना अडचणी येऊ लागल्या.

त्यामुळे प्रस्थापित पुढारी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे बोलत होते, तर स्थानिक घोडेबाजार टाळण्यासाठी हा निर्णय योग्य आहे, असे सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

भाजप सरकारच्या या निर्णयाला राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी विरोधच केला होता. त्यामुळे आता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आल्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सरकारने भाजप सरकारचा हा थेट जनतेतून सरपंच व नगराध्यक्ष निवड हा निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतली आहे.

या निर्णयामुळे अनेक ठिकाणी कही खुशी, कही गम असे चित्र दिसत आहे. २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या. स्थानिक पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या २०२० मध्ये होणार असल्याने वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभाग रचना, आरक्षण सोडत, अंतिम मतदार यादी तयार करणे आदी कामांना सुरुवात झाल्याने वातावरण तापणार असल्याचे दिसते.

राहुरी तालुक्यातील अंमळनेर, आंबी, बाभूळगाव, चेडगाव, चिंचाळे, चिंचविहिरे, दवणगाव, गुहा, गुंजाळे, जांभळी, कणगर खुर्द, करजगाव, कात्रड, केंदळ बु., केसापूर, खडांबे बु., कोळेवाडी, कोपरे, कुक्कडवेढे, कुरणवाडी, लाख, माहेगाव, पाथरे खुर्द, पिंपळगाव फुणगी, पिंपरी अवघड, राहुरी खुर्द, रामपूर, संक्रापूर, सात्रळ, तांभेरे, तांदुळनेर, तांदुळवाडी, तिळापूर, उंबरे, वडनेर, वळण, वांबोरी, वांजूळपोई, वरशिंदे, वरवंडी, वावरथ, बोधेगाव, धानोरे, गणेगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुका नवीन वर्षाच्या मध्यावर होणार आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24