Breaking News : दुष्काळी स्थितीमुळे सध्या शासनाने पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. असे असले तरी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्जाची नियमित परतफेड केली तरच शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कर्जाची नियमित परतफेड करणे गरजेचे आहे. असे केले नाही तर त्यांना पुन्हा बिनव्याजी कर्ज मिळणार नाही. याबाबत बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांनी पीक कर्जाची नियमित परतफेड करून पुन्हा बिनव्याजी कर्ज घ्यावे, असे आवाहन कर्डीले यांनी केले आहे.
पुन्हा सुधारित आदेश
राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्याबाबत आदेश काढला होता. त्यामुळे या आदेशानुसार बँकेच्या संचालक मंडळाने देखील पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
परंतु आता सहकार विभागाने याबाबत सुधारित आदेश काढला असून यामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत सांगितले गेले आहे. या सुधारित आदेशानुसार आता ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या काळात पीक कर्ज घेतले आहे
ते मार्च २०२४ मध्ये वसुलीस पात्र आहे, अशा पीक कर्जाच्याच वसुलीला फक्त स्थगिती असून ऊस पीक, पशुपालन, खेळते भांडवल, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज हे मात्र स्थगितीला पात्र नसणार आहेत. त्यामुळे या कर्जाची नियमित वसुली केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नियमित कर्जफेड करा व शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ घ्या
या आदेशानुसार आता पीक कर्जाची नियमित परतफेड न केल्यास शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरून नव्याने कर्ज घ्यावे, नियमित कर्जफेड करा व शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ घ्या असे आवाहन कर्डिले यांनी केले आहे.