ब्रेकिंग

बँक भरती परीक्षेत कॉपी ; इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसचा वापर करणारा उमेदवार अटकेत !

Published by
Sushant Kulkarni

२१ जानेवारी २०२५ नवी मुंबई : रायगड डिस्ट्रिक सेंट्रल को-ऑप.बँकेतील भरतीसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस व स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून कॉपी करणाऱ्या एका उमेदवाराला परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांनी शनिवारी रंगेहाथ पकडले.

आकाश भाऊसिंग घुनावत (२८) असे या उमेदवाराचे नाव असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सेट बीची प्रश्नपत्रिका स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून फोडण्यात देखील आकाश घुनावत व त्याच्या दोन सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले.त्यानुसार वाशी पोलिसांनी आकाश घुनावतला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली.

रायगड डिस्ट्रिक सेंट्रल को-ऑप. बँकेतील पदभरतीसाठी शनिवार, १८ जानेवारी रोजी वाशीतील फादर अॅग्नेल टेक्निकल कॉलेजमधील केंद्रावर प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेला जालना येथील उमेदवार आकाश घुनावत याने स्पाय कॅमेरा व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करून प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात केली.

परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांना आकाशवर संशय आल्याने त्यांनी वाशी पोलिसांना परीक्षा केंद्रात बोलावले.त्यानंतर पोलिसांनी आकाश घुनावतची तपासणी केली असता, त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस असल्याचे आढळले.आकाशने काळ्या रंगाच्या हँडकॅपमध्ये बॅटरीसदृश डिव्हाईस लपवून ठेवल्याचे तसेच त्याने कानामध्ये वायरलेस अँटीना असलेले मायक्रोफोन डिव्हाईस लावल्याचे आढळले.

तसेच त्याने आपल्यासोबत सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन लपवून ठेवल्याचे व त्याद्वारे तो आपल्या सहकाऱ्याच्या संपर्कात असल्याचे आढळले.या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसद्वारे आकाश घुनावत हा राहुल ठाकूरच्या मदतीने उत्तरे मिळवून कॉपी करत असल्याचे आढळल्यावर पोलिसांनी त्याच्याजवळ असलेले इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस व मोबाईल फोन जप्त करून त्याला ताब्यात घेतले.

आकाश घुनावतने इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस व मोबाईल फोनचा वापर करून कॉपी केल्याचे आढळल्यानंतर वाशी पोलिसांनी आकाश व त्याला या कामात मदत करणारे राहुल ठाकूर व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी आकाशला अटक करत इतरांचा शोध सुरू केला आहे.

आकाश घुनावतने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आलेल्या सेट-बीची प्रश्नपत्रिका स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून फोडल्याचे आयोगाने केलेल्या तपासणीत आढळले होते.त्यानंतर आयोगाने दिलेल्या तक्रारीवरून सीबीडी पोलिसांनी सप्टेंबर २०२३ मध्ये आकाश तसेच या कामात त्याला मदत करणारे जीवन नायमाने व शंकर जारवाल या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni