अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी – शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबरे (माळवाडी) येथे काल दुपारी एक वाजता भरधाव वेगाने जाणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनीबसने एका १० वर्षाच्या मुलास उडवून दिले. यात तो ठार झाला आहे.
शंतनु विजय शेलार, असे मृत मुलाचे नाव असून, तो पालकांचा एकुलता एक मुलगा होता. तो रस्त्याच्या कडेला उभा असताना हा दुर्दैवी अपघात झाला. घटनेनंतर जखमी शंतनुस तात्काळ राहुरी येथील कुसळकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर त्यास अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याची दुरुस्ती झाल्याने रस्त्यावर वाहनांचा वेग जास्त असतो.
त्यात या रस्त्याने अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच या नवीन रस्त्यावर राहुरीपासून शिंगणापूरपर्यंत कुठल्याही गावातील बसस्थानकाजवळ किंवा चौकामध्ये एकही स्पीडब्रेकर नसल्याने गेल्या दोन-तीन महिन्यामध्ये अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत.
त्यामुळे या रस्त्यालगत असणाऱ्या प्रत्येक गावातील बसस्थानकाजवळ स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत तसेच अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ व पालक वर्गातून होत आहे.