अहमदनगर – राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर प्रेस क्लब, हॉटेल बार व असोसिएशन, लिकर असोसिएशन, भारतभारती संघटना व सिध्दकला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त महारक्तदान शिबीर घेण्यात आले.
या महारक्तदान शिबीरात 631 रक्त पिशव्या संकलीत करुन रक्तदानाची विक्रमी संख्या गाठण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हुतात्मे व सिमेवर देश रक्षणाचे कार्य करणार्या जवानांना सलाम करीत या रक्तदानात युवकांसह नागरिकांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला. देशभक्तीचा जागर करीत केलेल्या उत्सफुर्त रक्तदानाने सामाजिक एकतेचे दर्शन घडले.
भारत मातेची प्रतिमा पूजन करुन दीपप्रज्वलनाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते महारक्तदान शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश सुनिलजीत पाटील, सौ.सोनल पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सागर पाटील, सबजेलचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्यामकांत शेडगे, जिल्हा वनसंरक्षक आदर्श रेड्डी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, लिकर्स असो.चे अध्यक्ष अजय पंजाबी, हॉटेल बार असो.चे अरुण बोराटे, डॉ.मनोज निंबाळकर, उपमहापौर मालनताई ढोणे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोक झोटींग, संदिप बोरुडे, कल्पेश परदेशी उपस्थित होते.
प्रास्ताविकात हॉटेल बार असो.चे डॉ.अविनाश मोरे यांनी रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. रक्ताचा तुटवडा न भासता गरजवंताला वेळेवर रक्त उपलब्ध होण्याच्या भावनेने दरवर्षी रक्तदान शिबीर घेतले जाते. यावर्षी महारक्तदान शिबीर घेऊन विक्रमी रक्तदान केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत शिवाजी शिर्के यांनी केले.
राहुल द्विवेदी यांनी रक्तदानाने गरजूला नवीन जीवदान मिळते. रक्त कृत्रीम पध्दतीने तयार होत नसल्याने रक्तासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून आहे. माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने रक्तदान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पराग नवलकर यांनी देशभक्ती फक्त घोषणा देऊन व्यक्त होत नसून, त्यासाठी योगदान देखील आवश्यक आहे. प्रत्येकाने रक्तदान करुन आपल्या बांधवांच्या जीवनासाठी रक्ताचा तुटवडा भरुन काढणे हा देशभक्तीचाच एक भाग आहे.
या महारक्तदान शिबीरात सहभागी होऊन राष्ट्र व आपल्या बांधवांप्रती दाखवलेल्या आपुलकीबद्दल त्यांनी रक्तदात्यांना सलाम केला. तर आपल्या कारकिर्दीत या शिबीरासह अद्याप पर्यंन्त 6 हजार पेक्षा जास्त रक्तांच्या पिशव्या संकलीत करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यात सेवा करीत असताना रक्तदान शिबीराची मोहिम सुरु केली. नगर जिल्ह्यात देखील ही परंपरा चालू ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.
बुरुडगाव रोड, नक्षत्र लॉन येथे रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालेल्या महारक्तदान शिबीर संध्याकाळी 6 वाजे पर्यंन्त चालले. या शिबीरासाठी अकोले, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आदि संपुर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी हजेरी लावली होती. जिल्हाधिकारींसह उपस्थित पाहुण्यांनी देखील महारक्तदान शिबीरात रक्तदान करुन सहभाग नोंदवला. शिबीरातील पहिले रक्तदाते शेखर गायकवाड याचा विशेष सत्कार करुन, रक्तदान करणार्या सर्व रक्तदात्यांचा सत्कार करुन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच यावेळी सांगली, कोल्हापूर मधील पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत आयोजकांच्या वतीने जमा करण्यात आली.
याला नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत जीवनावश्यक वस्तू देऊन सढळ हाताने मदत केली. आभार राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक संजय सराफ यांनी मानले. रक्तदात्यांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जनकल्याण, अष्टविनायक, अर्पण, जिल्हा रुग्णालय, विखे पाटील मेडिकल कॉलेज, अहमदनगर ब्लड बँक, आनंदऋषीजी हॉस्पिटल, जनसेवा (श्रीरामपूर) या रक्तपिढ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक विभाग व संस्थेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.