कत्तलखाने बंद करा; बजरंगदलाचे पोलीस अधीक्षकांना साकडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  पोलीस निरीक्षक देशमुख यांनी संगमनेरचा पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच शहरातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. सर्व कत्तलखाने त्यांनी बंद केले.

मात्र आता कत्तलखाने सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान बेकायदेशीर कत्तलखाने पुन्हा सुरु होऊ लागल्याने बजरंग दलाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या प्रश्नी आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा पोलीस प्रमुख यांची काल भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.

बजरंग दलाचे उत्तर नगर जिल्हा संयोजक सचिन कानकाटे, कुलदीप ठाकूर, विशाल वाघचौरे, वाल्मिक धात्रक अधिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन संगमनेर तालुक्यातील बेकायदेशीर कत्तलखान्यांबाबत निवेदनाद्वारे माहिती दिली.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून संगमनेर शहर व तालुक्यात राजरोसपणे गोवंश हत्या चालू आहे. याची माहिती संगमनेर शहर व तालुका पोलीस स्टेशनला वेळोवेळी देण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत आरोपींना जागेवर अटक होत

नाही व छापा टाकल्यानंतर आरोपींना फरार दाखवतात व आरोपींना पाठीशी घातले जाते. गोवंश हत्या करणारे आरोपी व त्यांच्या वाहनांवर गुन्हे दाखल असूनही पुढेही दरवेळी तीच वाहने त्याच गुन्ह्यात वापरली जातात व आरोपी गुन्हे करतात. संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे.

गोवंश व्यापार्‍यांचे काही पोलिसांशी मैत्रीचे संबंध आहेत, असा आरोप बजरंग दलाने निवेदनात केला आहे. दरम्यान या सर्व घडामोडीबाबत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख म्हणाले कि, मी जोपर्यंत संगमनेरला आहे तोपर्यंत कत्तलखाने सुरू होऊ देणार नाही.

कत्तलखाने सुरू असल्याची माहिती कोणीही येऊन मला सांगावे संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई केली जाईल, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24