अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- “गर्भवती असलेल्या आपल्या सुनेची, शैलाची प्रसूती चालू कंटेनरमध्ये करावी लागली तर त्यासाठी नाळ कापायला दोन नवे ब्लेड ,कापूस,स्पिरीट आणि निरुपयोगी कपडे मिळतील का ? ” असे विष्णू यादव याने विचारले तेव्हा राहत केंद्रावरील सर्वजण सुन्न झाले.
उत्तर भारतातील आपल्या घरांकडे पायी , सायकलिंद्वारे तसेच मिळेल त्या वाहनाने हजारो श्रमकरी परतत आहेत.त्यांच्यासाठी निंबळक बायपास रस्त्यावर विविध स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन राहत केंद्र सुरू केले.
आज सकाळी नवी मुंबई कडून आलेल्या त्या कंटेनर मध्ये सामान भरल्यासारखे वाटत होते . ट्रकचालकाला स्वयंसेवकांनी ओरडून सांगितले , ” मुफ्त खाना पानी है, आजाओ” यावर ट्रक हळू करीत त्याने विचारले, “यहाँ पोलीस है क्या?” कार्यकर्त्यांनी सांगितले, नाही, सर्व सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेच आहेत.
ट्रकच्या मागील बाजूस झाकलेले कापड त्याने दूर केले.आत मध्यभागी फळ्या टाकून दुमजली गाडी बनवली होती. दोन्ही ठिकाणी मिळून १३० लोक होते. बहुतांश पुरुष उष्म्यामुळे फक्त अंडरपॅन्ट वर बसलेले होते .
याशिवाय गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्ध लोक खालच्या कप्प्यात शेवटी कोपर्यात बसली होती. मेंढरं-कोंबड्यांपेक्षाही वाईट अवस्थेत ही माणसं घरी परतण्यासाठी जीवंत होती. हे लोक खाली उतरले, तेव्हा मोठे श्वास घेतानाचा त्यांचा आवाज सर्वांना अस्वस्थ करीत होता.
गोरखपुर हा उत्तर प्रदेशचे आणि नेपाळच्या सीमेवर असणारा जिल्हा.तेथे हे लोक जात होते. यात रंगारी ,सुतार, बांधकाम मजूर , काच काम करणारे असे लोक होते.
सर्वांना हायजीन किट,मास्क, पोटभर जेवण आणि पाणी राहत केंद्रावर देण्यात आले. याशिवाय येथे ठेवलेल्या सामान्य औषधांची माहिती ध्वनिक्षेपकावरून सांगितली.
त्यासाठी ही मोठी गर्दी झाली. यावेळी आलेल्या विष्णु यादव याने स्वयंसेवकांना गाडीजवळ नेत आत पडलेली गलीतगात्र सून दाखवली.
९ वा महिना सुरू झाल्याने तिच्या प्रसूतीची कधीही शक्यता होती. त्याचा मुलगा मजुरीसाठी गुजरात मध्ये गेला होता, तेथेच अडकला. घर भाडे थकल्याने मालकाने त्यांना घराबाहेर काढले.
त्यामुळे आपल्या मूळ गावाकडे सुनेला आणि पत्नीला घेऊन ते निघाले होते.नगरमध्ये थांबले तर प्रसूतीची व्यवस्था करण्यासाठी राहत टीम ने त्यांना विनवले. परंतु ते थांबले नाहीत. त्यांना लागणाऱ्या आवश्यक गोष्टी देण्यात आल्या.
पुणे येथील एका कंपनीमध्ये काम करणारे ६० रोजंदारीचे कामगार लहान ट्रक मधून बिहार कडे निघाले होते.त्यांनी मुर्तीजापुर पर्यंत जाण्यासाठी अमरावती ची एक गाडी मिळवली होती. गाडीमधून ते बाहेर निघाले तेव्हा सर्वजण घामाने ओलेचिंब झाले होते. कारण पोलिसांनी धरू नये म्हणून आत प्रकाश (आणि हवा ) येऊ नये अशी तजवीज गाडी चालकाने केली होती. जीव मुठीत घेऊन ते सर्वजण ७२ तासाच्या जीवघेण्या प्रवासाला निघाले होते. त्या सर्वांनी मनसोक्त पाणी अंगावर घेतले आणि उन्हाने होणारी अंगाची लाही कमी केली.
देशभक्तीपर गाणे आणि तिरंगा
राहत केंद्रात सर्वत्र भारताचे राष्ट्रध्वज , तिरंगी झेंडे लावण्यात आले आहेत .तसेच देशभक्तीपर आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारे गाणे वाजविण्यात येत आहेत. सैनिकांचे स्वागत करताना आणि निरोप देताना ,”भारत माता की जय, कश्मीर हो या कन्याकुमारी ,भारत माता एक हमारी,” आदी घोषणा देण्यात येतात. करोना संकट ओसरल्यावर महाराष्ट्र कामासाठी परत या, तुमचे हार्दिक स्वागत असेल, असेही ध्वनिक्षेपकाद्वारे संयोजक सर्व श्रमिकांना सांगतात.
लाल टाकी सेवा मंडळ,स्नेहालय , अनामप्रेम, हेल्पिंग हँड्स फोर हंगर्स , पीस फाउंडेशन, आय लव नगर, इनरव्हील रोटरी क्लब, शांतीकुमार फिरोदिया फाउंडेशन, लायन्स क्लब, अण्णा हजारे प्रणित स्वयंसेवी संस्थांचा महासंघ, उद्योजकांची आमी संघटना, क्रॉम्प्टन कंपनी, अहमदनगर मधील सकल जैन समाज, यांच्या पुढाकाराने दिनांक ११ मे पासून स्थलांतरित कामगारांसाठी राहत केंद्र कार्यरत आह.
श्रमिकांना वाहून नेणारी सरासरी दररोज १४० ते १६० वाहने रोज येथे थांबत आहेत. काल दिवसभरात पायी जाणाऱ्या सुमारे ६०० लोकांनी ग्राहक केंद्राच्या सेवेचा लाभ घेतला.प्यारेलाल खंडेलवाल यांनी येथील मुदपाकखान्याची जबाबदारी आपल्या टीमसह पेलली आहे. पुरी,भाजी, पुलाव भात, मुरमुरे, फरसाण, चहा, बिस्कीटची पुडे, फळ , सानीटरी नॅपकिन, कपडे, पादत्राणे अशा गोष्टींचेही वाटप करण्यात येत आहे.
येथे सहा तासांच्या चार पाळ्यांमध्ये स्वयंसेवक सेवा देत आहेत. अहोरात्र (२४ *७) चालणारे ‘मिशन राहत’ अभियान पायी चालणाऱ्यांना शासन यंत्रणेच्या मार्फत मोफत महाराष्ट्र सीमेपर्यंत पोहोचविण्याचीही व्यवस्था करते. आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांना शासनाच्या सेवे चा लाभ देऊन त्यांची पायपीट केंद्राने वाचवली आहे.
पुढील दोन दिवसात काश्मीर मधील पाकिस्तान सीमेवरून शिक्षणासाठी स्नेहालय संस्थेत आलेल्या २५ आणि इतर संस्थांमधील ४० विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबात काश्मीरमध्ये पाठविले जाणार आहे. त्यासाठी सरहद या संस्थेचे संजय नहार (पुणे) राहत टीमला मदत आणि मार्गदर्शन करीत आहेत.
११ मे ते १६ मे पर्यंत सुमारे २६ हजार स्थलांतरित कामगारांना ग्राहक केंद्राने दिलासा दिल्याचे संयोजक अजित कुलकर्णी ,संजय हरकचंद गुगळे ,हनीफ शेख आणि डॉ. महेश मुळे यांनी सांगितले.
उद्योजक आणि स्नेहालयाचे विश्वस्त जयकुमार मूनोत यांनी त्यांच्या ‘मायक्रोटेक कारखान्यातील’ कामगारांना या सेवा कार्य पूर्णवेळ सहभागी केले आहे. पुढील आठवड्यापर्यंत परतणाऱ्या श्रमिकांची संख्या वाढत जाणार आहे. येथे सेवाकार्य करण्यासाठी तसेच अन्नधान्याची मदत देण्यासाठी ९०११०२०१७३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क असे आवाहन सर्व सामाजिक संस्था संघटनांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com