श्रीगोंदे: शिवाजीराव नागवडे यांनी सहकार चळवळ उभी करून कारखान्याची उभारणी केली. तळागाळातील शेतकऱ्यांनी पैसे दिले.
बापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता ,पण बापू गेल्यानंतर कारखान्याची वाईट अवस्था झाली असून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हुकूमशाही सुरू केली असून कारखान्याच्या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवून सुडाचे राजकारण करत आहेत, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहाटा व प्रा. तुकाराम दरेकर यांनी शनिवारी श्रीगोंदे येथे केली.
शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ४ ते ५ महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ४३ सेवा संस्थांपैकी फक्त १० सेवा संस्था क्रियाशील ठेवल्या आहेत,
तर ३३ सेवा संस्था अक्रियाशील केल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील ३३ संस्था मतदानापासून वंचित राहणार आहेत, कारखान्याचे सुमारे २० हजार ६४० सभासद असून अवघे ६ हजार ७०० सभासदांनाच मतदान करता येईल आणि उर्वरित सभासद अक्रियाशील केले आहेत,
या निर्णयाच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, राजेंद्र म्हस्के यांनी सर्वसामान्य सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी बंड पुकारले असून शनिवारी सकाळी श्रीगोंदे येथील जिल्हा सहकारी बँकेमध्ये अक्रियाशील सेवा संस्थांचे चेअरमन व सचिव यांची बैठक घेऊन क्रियाशील करण्यासाठी मार्गदर्शन केले.
वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ पण कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. या वेळी बाबासाहेब भोस यांनी सांगितले की, श्रीगोंदे कारखान्याची निवडणूक ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे, जर कोणी हुकूमशाहीचा वापर करत असेल,
तर मोडीत काढू आणि सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवणार, तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी सांगितले की, जोपर्यंत बापू होते तोपर्यंत काम चांगले होते,
मी संचालक आहे पण बापू गेल्यापासून मनमानी कारभार सुरू झाला आहे म्हणून दोन वर्षे झाली मी एकदाही कारखान्यावर गेलो नाही. सर्वांनी एक व्हा आणि यापुढे नागवडेंबरोबर कधीच राजकारण करणार नाही.
जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे म्हणाले, राजेंद्र नागवडे यांना पराभव दिसत असल्याने ते घाबरले आहेत, म्हणून सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा हा डाव कधीच यशस्वी होऊ नाही नागवडे सुडाचे राजकारण करत आहेत, असा आरोप पानसरे यांनी केला.