अहमदाबाद : मासिक पाळी आली किंवा नाही, हे पडताळून पाहण्यासाठी गुजरातच्या एका महाविद्यालयाने तब्बल ६८ विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे काढण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना शुक्रवारी उजेडात आली आहे.
गुजरातच्या भूज येथील सहजानंद गर्ल्स इ्स्टिटट्यूटमध्ये ही घटना घडली आहे. या संस्थेच्या नियमांनुसार, विद्यार्थिनींना मासिक पाळी येते तेव्हा त्यांना कॉलेजमधील धार्मिक स्थळ व हॉस्टेलच्या स्वयंपाक घरात जाण्यास बंदी असते. विशेषत: या स्थितीत त्यांना दुसऱ्यांना स्पर्श करण्याचीही परवानगी नसते.
काही मुलींनी या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर या अश्लाघ्य गोष्टीचा भंडाफोड झाला आहे.
‘अहमदाबाद मिरर’च्या वृत्तानुसार, या संस्थेच्या हॉस्टेलच्या अधीक्षिका अंजलीबेन यांनी गुरुवारी काही मुलींनी मासिक पाळीशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार प्राचार्यांकडे केली होती. त्यानंतर प्रशासनाने संबंधित मुलींना वर्गातून बाहेर काढले.
त्यांना मासिक पाळी सुरू आहे काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी २ मुलींनी हात वर केले. त्यांना बाजूला करण्यात आले. तद्नंतर तब्बल ६८ मुलींना कॉलेजच्या स्वच्छतागृहात नेऊन त्यांना खरेच पाळी आली किंवा नाही, हे तपासण्यासाठी त्यांचे कपडे व अंतर्वस्त्रे काढण्यात आली.
या घटनेची मुलींनी संस्थेच्या विश्वस्तांकडे तक्रार केली; पण प्रशासनाने हा धार्मिक मुद्दा असल्याचे सांगत हे प्रकरण इथेच संपविण्याची विनंती केली. त्यामुळे या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही. दरम्यान, कच्छ विद्यापीठाने या प्रकरणी ५ सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे.