अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मृतावस्थेत सापडलेला कावळा बर्ड फ्ल्यूच्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविला होता.
त्याचा अहवाल दिलासादायक आला आहे म्हणजेच या मृत कावळ्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दरम्यान कोरोनानंतर राज्यावर तसेच जिल्ह्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट घोंगावत आहे. नुकतेच पाथर्डी तालुक्यात पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात देखील प्रशासन अलर्ट झाले आहे.
नुकतेच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे गेल्या सहा-सात दिवसांत अनेक कावळे मृतावस्थेत आढळून आले होते.
याची प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी घारगाव व दहा किलोमीटरचा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. दरम्यान पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविलेला कावळ्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
यामुळे कुक्कुटपालन व्यवसायात लाखो रुपये गुंतवणूक करणार्या तरुण उद्योजक, पशु संवर्धन व वन विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तरी नागरिकांनी भीती न बाळगता खबरदारी घेणे गरजेचे आहे.